महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – लातूर पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या संकल्पनेतून लातूर जिल्हा पोलीस दलाने सुरू केलेल्या ‘पोलीस विद्यार्थी संवाद’ उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दि. १ ऑगस्ट २०२६ पासून सुरू झालेल्या या उपक्रमाअंतर्गत आजच एकाच दिवसात जिल्ह्यातील ११ शाळा व महाविद्यालयांना भेट देऊन पोलीस अधिकाऱ्यांनी एकूण ३९०९ विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला.
या संवादादरम्यान विद्यार्थ्यांना नशामुक्त भारत अभियान आणि अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबद्दल, भारतीय न्यायव्यवस्थेतील नवीन कायदे, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय, एनडीपीएस कायदा, पोक्सो कायदा, वाहतूक नियमांचे पालन तसेच हेल्मेट व सीटबेल्ट वापरण्याचे महत्त्व या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करून कायद्याबाबत जनजागृती करण्यात आली.
गांधी चौक पोलीस स्टेशन हद्दीतील व्यंकटेश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय (सपोनि श्री. करे), विवेकानंद चौक पोलीस स्टेशन हद्दीतील जिजामाता विद्यालय (सपोनि श्री. उजगरे), एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील स्वामी विवेकानंद विद्यालय (पोनि श्री. चवरे), कासार शिरसी पोलीस स्टेशन हद्दीतील रहमानिया उर्दू शाळा (सपोनि श्री. गर्जे), औराद शहाजनी पोलीस स्टेशन हद्दीतील एमडीएम कॉलेज (सपोनि श्री. बांगर), उदगीर शहर पोलीस स्टेशन हद्दीतील शिवाजीराजे महाविद्यालय (सपोनि श्री. कारवार), शिरूर अनंतपाळ पोलीस स्टेशन हद्दीतील विवेकानंद विद्यालय निटूर (पोनि श्री. भंडे), किनगाव पोलीस स्टेशन हद्दीतील भगवान विद्यालय (सपोनि श्री. डोके), वाढवणा पोलीस स्टेशन हद्दीतील शिवाजी विद्यालय हंडरगुळी (सपोनि श्री. गायकवाड), मुरुड पोलीस स्टेशन हद्दीतील मौलाना आझाद उर्दू स्कूल (सपुने श्री. अंधारे), किल्लारी पोलीस स्टेशन हद्दीतील महाराष्ट्र विद्यालय (सपोनी श्री. जाधव) आणि जळकोट पोलीस स्टेशन हद्दीतील राजश्री माध्यमिक विद्यालय (पोउपनी श्री. राठोड) या ठिकाणी अधिकारी विद्यार्थ्यांशी संवाद साधून मार्गदर्शन करत होते.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे या उपक्रमाचा नियमित आढावा घेत असून, पोलीस व विद्यार्थ्यांमधील संवाद अधिक प्रभावी, विश्वासार्ह आणि परिणामकारक व्हावा तसेच विद्यार्थ्यांमध्ये कायद्याबद्दल जागरूकता, सामाजिक उत्तरदायित्व आणि सकारात्मक बदल घडावा, यासाठी त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत.
हा उपक्रम पोलीस-विद्यार्थी संबंध अधिक मजबूत करत असून, कायद्याची जाणीव निर्माण करून समाजात सकारात्मक बदल घडविण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे.




