महाराष्ट्र खाकी ( लातूर / प्रतिनिधी ) – शिक्षणाची नगरी म्हणून देशभरात ओळख निर्माण केलेल्या लातूरच्या ‘लातूर पॅटर्न’ची नवी आणि व्यापक व्याख्या यंदा बप्पा गणेश मंडळ आपल्या पथनाट्यातून प्रभावीपणे मांडत आहे. ‘लातूर पॅटर्न–बावनकशी सोनंच’ या संकल्पनेतून सादर होणारे हे पथनाट्य केवळ परीक्षेतील गुण, निकाल किंवा करिअरच्या पारंपरिक चौकटीपुरते मर्यादित न राहता, विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य, पालकांच्या अपेक्षा, शिक्षणातील बदलती मूल्यव्यवस्था आणि विद्यार्थ्यांच्या विविध क्षमतांना योग्य दिशा देण्याचा महत्त्वपूर्ण संदेश देते. – शिक्षणाची नगरी म्हणून देशभरात ओळख निर्माण केलेल्या लातूरच्या ‘लातूर पॅटर्न’ची नवी आणि व्यापक व्याख्या यंदा बप्पा गणेश मंडळ आपल्या पथनाट्यातून प्रभावीपणे मांडत आहे. ‘लातूर पॅटर्न–बावनकशी सोनंच’ या संकल्पनेतून सादर होणारे हे पथनाट्य केवळ परीक्षेतील गुण, निकाल किंवा करिअरच्या पारंपरिक चौकटीपुरते मर्यादित न राहता, विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य, पालकांच्या अपेक्षा, शिक्षणातील बदलती मूल्यव्यवस्था आणि विद्यार्थ्यांच्या विविध क्षमतांना योग्य दिशा देण्याचा महत्त्वपूर्ण संदेश देते.
बप्पा गणेश मंडळ गेल्या अनेक वर्षांपासून ‘समाजभान रुजवूया’ या विचारातून समाज, संस्कृती, अध्यात्म, आरोग्य आणि शिक्षण या पंचसूत्रीवर आधारित विविध जनजागृतीपर उपक्रम राबवत आहे. याच सामाजिक बांधिलकीतून यंदाच्या उत्सवात शिक्षणासारख्या प्रत्येक कुटुंबाशी निगडित विषयाची निवड करण्यात आली आहे.
पथनाट्य लातूरमधील विद्यार्थी संख्या, बाहेरगावाहून येणारे विद्यार्थी, शहरातील शैक्षणिक सुविधा आणि ‘लातूर पॅटर्न’ची ओळख यांचा संदर्भ घेत लातूरच्या शैक्षणिक योगदानाची सकारात्मक बाजू मांडते. त्याचवेळी पेपरफुटीसारख्या घटनांमुळे निर्माण होणारी चिंता, पैशाचा हव्यास आणि स्वार्थी प्रवृत्तीमुळे शिक्षणव्यवस्थेवर निर्माण होणारे प्रश्न यांकडेही लक्ष वेधते. मात्र अशा घटनांमुळे लातूरच्या शैक्षणिक संस्कृतीची वाटचाल थांबत नाही, असा आशावादी संदेश पथनाट्य देते.
शिस्त, मेहनत, सातत्य आणि शिक्षक-विद्यार्थी-पालक यांच्यातील विश्वास यांची सांगड म्हणजे खरा लातूर पॅटर्न, असे हे पथनाट्य अधोरेखित करते. म्हणजेच लातूर पॅटर्न हा केवळ दहावी-बारावीच्या निकालातील भरघोस गुणांचा किंवा अव्वल क्रमांकांचा विषय नाही; तर विद्यार्थ्याच्या क्षमतेला ओळखून त्याला योग्य दिशा देण्याची संस्कृती आहे, हा विचार प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
गुणांच्या ओझ्याखाली दबणाऱ्या स्वप्नांचा प्रश्न हा पथनाट्यातील एक संवेदनशील टप्पा आहे. निकालाच्या दिवशी काही घरांमध्ये आनंद तर काही घरांमध्ये अश्रू का असतात? कमी गुण मिळाल्यानंतर काही विद्यार्थी टोकाचे निर्णय का घेतात? या प्रश्नांवर पथनाट्य थेट भाष्य करते. ‘अपयश हा आयुष्याचा शेवट नसून नव्या प्रवासाची सुरुवात आहे,’ हा संदेश देताना विद्यार्थ्याची किंमत त्याच्या गुणांवर ठरवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. पालकांनी मुलांसाठी केलेले कष्ट आणि अपेक्षा जेव्हा मुलांच्या स्वप्नांवर ओझे बनतात, तेव्हा निर्माण होणारी परिस्थितीही प्रभावीपणे मांडण्यात आली आहे.
‘शेजाऱ्याचा मुलगा डॉक्टर झाला’, ‘माझ्या मुलाने त्याच्यापेक्षा पुढे गेलेच पाहिजे’ अशा तुलनात्मक मानसिकतेवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. प्रत्येक मुलाची बुद्धी, आवड आणि क्षमता वेगळी असते. त्यामुळे यशाचा मार्गही वेगळा असू शकतो. आज वैज्ञानिक, संशोधक, कृषी तज्ज्ञ, डेटा सायंटिस्ट, एआय इंजिनिअर, सायबर सिक्युरिटी तज्ज्ञ, उद्योजक, शिक्षक, लेखक, पत्रकार, वकील, आर्किटेक्ट, कलाकार, संगीतकार, क्रीडापटू तसेच संरक्षण क्षेत्रातील विविध संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे करिअरची निवड समाजाच्या अपेक्षांनुसार नव्हे, तर विद्यार्थ्याची आवड, क्षमता आणि योग्य मार्गदर्शन लक्षात घेऊन व्हावी, असा संदेश देण्यात आला आहे.
शिक्षण ही केवळ आर्थिक गुंतवणूक नाही, हा मुद्दाही पथनाट्य अधोरेखित करते. पालक फी, क्लासेस आणि कोचिंगवर मोठा खर्च करतात; मात्र मुलांच्या शिक्षणातील सर्वात मोठी गुंतवणूक वेळ, संस्कार, विश्वास आणि संवाद आहे. शिक्षणाचे व्यापारीकरण आणि शिक्षक-विद्यार्थी संबंध यांवरही संवादाच्या माध्यमातून भाष्य केले जाते. शिक्षकाला केवळ फी घेणारा व्यक्ती न मानता विद्यार्थ्याचे भविष्य घडविणारा मार्गदर्शक म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन मांडला आहे.
‘बावनकशी सोनं’ या संकल्पनेमागे लातूरच्या शैक्षणिक परंपरेचा अभिमान आहे. बावनकशी सोनं जसे शुद्धतेसाठी ओळखले जाते, तसेच लातूरच्या शिक्षणपरंपरेची शुद्धता केवळ गुणांच्या चमकण्यात नसून मेहनत, शिस्त, संस्कार, ज्ञान आणि योग्य दिशादर्शनात आहे.
पथनाट्याच्या अखेरीस गुरुजींच्या माध्यमातून स्पष्ट संदेश दिला जातो – मुलांना स्वप्नं द्या; स्वप्नांवर बंधनं घालू नका. करिअर निवडताना समाज काय म्हणेल यापेक्षा मुलाच्या मनाचा आवाज ऐकला पाहिजे. कारण मुलांच्या गुणांपेक्षा त्यांच्या स्वप्नांना योग्य दिशा देणे हाच खरा ‘लातूर पॅटर्न’ आहे.
बप्पा गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मनोरंजन, संवाद आणि सामाजिक संदेश यांचा प्रभावी मेळ साधत हे पथनाट्य उभे केले आहे. पथनाट्याचे सादरीकरण शिवदर्शन राचट्टे, कुमार चोथवे, अभिषेक राजपूत, सुरज आवसकर आणि रोहन ढगे हे करत आहेत. आतापर्यंत लातूर शहरासह निलंगा, आलमला, औसा येथील अनेक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले आहे.
लातूरच्या शैक्षणिक परंपरेचा गौरव करतानाच आजच्या प्रश्नांवर आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडणारे आणि ‘गुणांच्या पलीकडेही मुलांमध्ये असलेलं सोनं ओळखा’ असा विचार देणारे हे पथनाट्य यंदाच्या बाप्पाउत्सवातील एक महत्त्वपूर्ण जनजागृतीपर उपक्रम ठरत आहे.




