महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप) – मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई शाखा लातूरच्या वतीने मानाचा ‘लातूर भूषण पुरस्कार-२०२६’ खडगावचे नेहरू शंकरराव देशमुख यांना गुरुवार, दि. १७ सप्टेंबर रोजी सकाळी दयानंद सभागृह, बार्शी रोड, लातूर येथे आयोजित सोहळ्यात प्रदान करण्यात आला. पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारताना नेहरू देशमुख यांनी सहपरिवार उपस्थित राहून गौरव स्वीकारला.
लातूर जिल्ह्यात सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या नेहरू देशमुख यांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी भारतीय किसान युनियन मराठवाडा अध्यक्ष म्हणून शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्या नेतृत्वात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तसेच खाकी फाऊंडेशनच्या माध्यमातून प्रशासन आणि सामान्य जनता यांच्यातील दुवा म्हणून त्यांनी प्रभावी कार्य केले आहे.
लातूर आणि लातूरकरांच्या हितासाठी समर्पित राहिलेल्या नेहरू देशमुख यांच्या सामाजिक कार्याचा हा गौरव म्हणजे त्यांच्या अथक सेवेची खरी दखल आहे. या पुरस्काराने लातूर जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्यांना नवीन प्रेरणा मिळाली आहे.




