महाराष्ट्र खाकी ( लातूर / प्रतिनिधी ) – पत्रकारिता क्षेत्रात गेल्या दोन ते अडीच दशकांपासून सातत्याने समाजाच्या आवाजाला बळ देणारे ज्येष्ठ पत्रकार लिंबराज पन्हाळकर यांना यंदाचा प्रतिष्ठित ‘लातूर भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई (जिल्हा शाखा, लातूर) यांच्या वतीने आयोजित या सन्मान सोहळ्यात त्यांच्या दीर्घकाळच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेतली गेली. लातूर येथील दयानंद सभागृहात झालेल्या कार्यक्रमात पन्हाळकर यांचा सन्मानपत्र आणि शाल देऊन गौरव करण्यात आला. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याची जबाबदारी नसून समाजातील प्रश्नांना वाचा फोडण्याचे आणि सामान्यांच्या व्यथा-समस्या प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे प्रभावी माध्यम आहे, ही भूमिका त्यांनी गेल्या २०-२५ वर्षांत सातत्याने सांभाळली. सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय आणि जनहिताच्या विविध मुद्द्यांना त्यांनी प्रसिद्धी देत जनतेच्या नाळाशी जोडलेले राहिले.
कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून सहकारमंत्री बाबासाहेब पाटील आणि विद्यानंद सागर महाराज उपस्थित होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे संस्थापक संजय भोकरे तर स्वागताध्यक्ष म्हणून आमदार अभिमन्यू पवार होते. पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यावेळी म्हटले, “पुरस्कारामुळे सत्कारमूर्तींची जबाबदारी आणखी वाढते. पत्रकारितेच्या माध्यमातून समाजहिताचे कार्य सुरू ठेवत लातूरच्या नावलौकिकात आणखी भर घालावी.” सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, विद्यानंद सागर महाराज आणि संजय भोकरे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अशोक देडे यांनी केले. सूत्रसंचालन सुशील सूर्यवंशी यांनी तर आभार अशोक हनवते यांनी मानले. दीर्घकाळाची पत्रकारिता, जनतेच्या प्रश्नांशी असलेली नाळ आणि सातत्यपूर्ण सामाजिक बांधिलकीचा सन्मान म्हणून मिळालेल्या या ‘लातूर भूषण’ पुरस्काराने पत्रकार लिंबराज पन्हाळकर यांच्या कार्याला नवी ऊर्जा मिळाली आहे. लातूरच्या पत्रकारिता क्षेत्रात त्यांच्या योगदानाला आता अधिक उंचावलेले स्थान प्राप्त झाले आहे.




