ग्राम सुरक्षा दलामुळे पोलिसांवरील ताण कमी होण्यास मदत- उपमुख्यमंत्री अजित पवार

महाराष्ट्र खाकी ( बारामती ) – ग्राम सुरक्षा दलाच्या निर्मितीमुळे पोलिसांवरील ताण कमी होण्यास मदत होईल आणि ग्राम सुरक्षा दलाची यात्रा, नैसर्गिक आपत्ती इत्यादी ठिकाणी मदत घेता येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

बारामती तालुका पोलीस ठाण्याच्यावतीने ग्रामसुरक्षा दल स्थापना व किट वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार दिपक चव्हाण, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, वाड्या वस्त्यांवर पडणारे दरोडे यावर नियंत्रण बसेल. गावात गस्त घालणे, स्थानिक सुरक्षा इत्यादी कामे ग्राम सुरक्षा दलाकडून करून घेता येतील. ग्राम सुरक्षा दलाने चांगल्याप्रकारे काम करून पोलिसांना मदत करावी. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या नागरीकरणामुळे पोलीस दलात मनुष्यबळ कमी पडत आहे. पोलिस दलातील मनुष्यबळ भरण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल.

स्मार्ट पोलिसिंगसाठी आवश्यक सुविधा
महाराष्ट्राला शौर्याचा वारसा लाभला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी कष्टकऱ्यांचे, जनतेचे राज्य स्थापन केले. त्यांच्या विचारांचा आदर्श समोर ठरवून एकता आणि अनुशासन रुजविण्यासाठी प्रत्येकाचे योगदान हवे. पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था चोखपणे राखावी. जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या स्मार्ट पोलिसिंगसाठी पोलिसांना पायाभूत सुविधा देण्याबाबत शासन कटीबद्ध आहे. पोलीस विभागाला आवश्यक वाहने पुरविण्यात आली आहेत. अनेक ठिकाणी पोलीस वसाहत, पोलीस स्टेशनच्या इमारतींची कामे चालू आहेत.

महाराष्ट्राच्या पोलीस दलाचा देशात चांगला लौकीक आहे. कोरोना काळात पोलिसांनी खूप चांगल्या प्रकारे कर्तव्य बजावले आहे. देशसेवेची त्यागाची गौरवशाली परंपरा अशीच पुढे न्यावी असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केले.

यावेळी ग्राम सुरक्षा दलातील व्यक्तींना सुरक्षा किटचे वाटप उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय नागरी प्रकल्प हडपसर पुणे यांच्यावतीने कोविडमुळे मृत्यू पावलेल्या बारामती येथील अंगणवाडी मदतनीस विजय जोगदंड यांचा मुलगा प्रतीक जोगदंड याना सानुग्रह सहाय्य म्हणून 50 लाखांचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी संध्या नगरकर, पर्यवेक्षिका मिलन गीते उपस्थित होते.

कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक महेश
ढवाण, बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, एकात्मिक पुनर्विलोकन समितीचे अध्यक्ष संभाजी होळकर, माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, उद्योजक मनोज तुपे, शरयू फाउंडेशनचे सदस्य डी. एन. जगताप, सरपंच, पोलीस पाटील, ग्राम सुरक्षा दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Recent Posts