महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात पोलिसांनी पुन्हा एकदा आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे. सराईत चोरट्याला झटपट जेरबंद करत तीन चोरीच्या गुन्ह्यांची उकल केली आणि ५२ हजार ९९९ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई लातूर पोलिसांच्या सतर्कतेचे आणि व्यावसायिकतेचे उत्तम उदाहरण ठरली आहे. ३ जुलै २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शहरातील मालमत्ता चोरी रोखण्यासाठी गस्त घालत असताना गुप्त माहितीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली. नवीन रेणापूर नाका ते रेल्वे स्टेशन दरम्यान एक संशयित व्यक्ती चोरीचे मोबाईल विकण्याच्या उद्देशाने उभा असल्याचे कळताच पोलिसांनी तात्काळ सापळा रचला आणि आरोपीला यशस्वीरित्या ताब्यात घेतले.

चौकशीत आरोपीने आपले नाव दिनेश माधव टेकाळे उर्फ शंकर दत्तात्रय पाचाळ (वय ३४, रा. हरिभाऊ नगर, कृपासदन रोड, लातूर) असे सांगितले. त्याच्याकडून रोख ७ हजार रुपये व तीन मोबाईल फोन जप्त करण्यात आले. पुढील चौकशीत आरोपीने लातूर शहरातील दोन मेडिकल दुकानांमध्ये चोरी केल्याची आणि गर्दीच्या ठिकाणी मोबाईल फोन चोरल्याची कबुली दिली. या कारवाईत पोलीस ठाणे शिवाजीनगर येथील गुन्हा क्र. ११/२०२६, ३०/२०२६ आणि ३१५/२०२६ या तीन गुन्ह्यांची यशस्वी उकल झाली आहे. आरोपीकडून विवो, सॅमसंग आदी ब्रँडचे मोबाईल फोन व चोरीतील रोख रक्कम असा एकूण ५२,९९९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशानुसार आणि अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबवण्यात आली. पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव जगताप, पोलीस अंमलदार युवराज गिरी, मोहन सुरवसे, राजेश कंचे, जमीर शेख, राहुल कांबळे, प्रदीप स्वामी, सीद्धेश्वर मदने, काकासाहेब बोचरे, शैलेश सुडे, रामदास बाचीफळे यांच्या पथकाने ही उत्तम कामगिरी बजावली.
SP अमोल तांबे यांच्या नेतृत्वात लातूर पोलिस दलाने पुन्हा एकदा सिद्ध केले की, जनतेच्या सुरक्षेसाठी ते सज्ज आहेत आणि गुन्हेगारांना कठोरपणे हाताळण्याची त्यांची इच्छाशक्ती मजबूत आहे. अशा कारवायांमुळे नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना अधिक बळकट होत आहे.



