महाराष्ट्र खाकी ( लातूर /विवेक जगताप ) – लातूर शहरात वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) एक विशेष मोहीम उघडली आहे. याच मोहिमेअंतर्गत LCB चे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकाने अत्यंत शिताफीने कारवाई करत, चोरीच्या दोन दुचाकी विक्रीच्या तयारीत असलेल्या एका सराईत आरोपीला जेरबंद केले आहे. त्याच्याकडून ३५ हजार रुपये किमतीच्या दोन मोटारसायकली हस्तगत करण्यात यश आले आहे.
सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात अशी झाली कारवाई
१८ ऑगस्ट २०२६ रोजी लातूर शहरातील बस डेपो परिसरात एक इसम दोन मोटारसायकलींसह संशयास्पदरीत्या फिरत असल्याची खात्रीशीर माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचून संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या इसमाने आपले नाव खंडू ऊर्फ अजय बालाजी पवार असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली असता, त्याने सुमारे दोन महिन्यांपूर्वी लातूर शहरातील इंदिरानगर परिसरातून एक होंडा युनिकॉर्न आणि मंत्रीनगर येथून एक हिरो पॅशन प्लस मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. चोरलेल्या या दोन्ही गाड्या तो विक्री करण्याच्या तयारीत होता. पोलिसांनी त्याच्याकडून ३५ हजार रुपये किमतीच्या दोन्ही मोटारसायकली जप्त केल्या आहेत. या प्रकरणी आरोपीविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या तपासातून चोरीचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पोलीस पथकाचे उल्लेखनीय योगदान
सदर यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात पार पडली. या पथकात सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने तसेच पोलीस अंमलदार माधव बिलापटे, नवनाथ हासबे, रामलिंग शिंदे, तुराबखान पठाण, गणेश साठे, शैलेश सुडे आणि श्रीनिवास जांभळे यांनी सहभाग घेतला होता.




