महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – लातूर महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्तांसोबत झालेली धक्काबुक्की आणि असभ्य वर्तणुकीची अत्यंत गंभीर घटना समोर आल्यानंतर राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या मनमानी कारभाराविरोधात आणि वाढत्या असुरक्षिततेमुळे संतापलेल्या मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आक्रमक होत कामबंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाची व्याप्ती आता वाढली असून, आता चक्क सफाई कर्मचारीही सकाळपासून कामावर न आल्याने संपूर्ण शहरातील साफसफाईचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. लातूरच्या इतिहासात ही पहिलीच वेळ असावी, जेव्हा अशा प्रकारच्या संघर्षांमुळे शहरात साफसफाईचे कामकाज बंद ठेवावे लागले आहे.
सत्ताधारी आणि प्रशासनाचा संघर्ष चव्हाट्यावर
मनपा मधील सत्ताधारी आणि प्रशासन यांच्यातील वाढता संघर्ष आता विकोपाला गेला आहे. कालपासून सुरू असलेल्या या कामकाज बंद आंदोलनामुळे लातूर महानगरपालिकेचे कामकाज पूर्णपणे कोलमडले आहे. त्यातच स्वच्छता कर्मचाऱ्यांनीही कामबंदमध्ये सहभाग घेतल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा आणि शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
माजी महापौरांचा संतप्त प्रश्न
कुठं नेऊन_ठेवलय_लातूर_माझा?”
या संपूर्ण अनागोंदी कारभारावर आणि बिघडलेल्या प्रशासकीय स्थितीवर तीव्र संताप व्यक्त करत माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी सोशल मीडियावर एक आक्रमक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी म्हटले आहे की
“कुठं_नेऊन_ठेवलय_लातूर_माझा ? लातूर मध्ये प्रथमच सफाई कामकाज आज बंद राहिले.. लातूर मनपा मधील सत्ताधारी आणि प्रशासन यांच्या संघर्षातून कालपासून कामकाज बंद आंदोलन सुरू आहे, आज तर चक्क सफाई कर्मचारी सकाळपासून कामावर न आल्याने शहरातील साफसफाईचे कामकाज बंद राहिले आहे. लातूरचा इतिहासातील कदाचित जी पहिलीच घटना ठरावी. यानिमित्ताने हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतो…”
या घटनेमुळे लातूरमधील राजकीय वातावरण तापले असून, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचा आणि शहराच्या कारभाराचा प्रश्न गंभीर बनला आहे. यावर आता प्रशासन आणि सत्ताधारी नेमकी काय भूमिका घेतात, याकडे लातूरकरांचे लक्ष लागून आहे.




