महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – लातूर शहरातील लाखो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून लाखो-कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. प्रशासक आणि सत्ताधारी छाती ठोकून सांगतात की, “महानगरपालिकेचे पाणी पूर्णपणे पिण्यायोग्य आहे.” मात्र, हेच दावे पोकळ असल्याचे सिद्ध करणारा संतापजनक प्रकार समोर आला आहे. कागदावर पाणी पिण्यायोग्य असल्याचे सांगणारे हेच कारभारी स्वतः मात्र महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आणि दालनांमध्ये ‘बिस्लरी’च्या बाटल्या आणि जारचे पाणी रिचवत आहेत. सामान्य जनतेच्या आरोग्याशी आणि कराच्या पैशांशी चाललेला हा खेळ कधी आणि कोण थांबवणार. जनतेच्या नळाला येणारे पाणी चांगले आहे, तर नगरसेवक आणि अधिकाऱ्यांच्या टेबलवर ‘बिस्लरी’ का ?
दावे एकीकडे, कृती दुसरीकडे – प्रशासकीय अधिकारी आणि सत्ताधारी जाहीर भाषणांमध्ये महानगरपालिकेचे पाणी शुद्ध आणि पिण्यायोग्य असल्याचा दावा करतात. मग असा सवाल निर्माण होतो की, जर पाणी खरोखरच पिण्यायोग्य आहे, तर मग महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्व नगरसेवक, महापौर/अधिकारी यांच्यासाठी बाहेरून आणलेल्या बिस्लरीच्या बॉटल आणि जारचे पाणी कशासाठी लागत
सत्ताधारी आणि प्रशासनाची दुटप्पी भूमिका उघड – जनतेला मिळणाऱ्या पाण्याबाबत साशंकता निर्माण करणारी हीच कृती प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या दुटप्पी भूमिकेला उघडे पाडणारी आहे. जनतेला मात्र दुषित किंवा अशुद्ध पाण्याचा त्रास सहन करावा लागतो आणि दुसरीकडे लोकप्रतिनिधी मात्र व्हीआयपी पाण्याची बॉटल घेयची
जनतेच्या पैशांची उधळपट्टी कधी थांबेल? महानगरपालिका प्रशासनाचा हा कारभार म्हणजे एकाच गोष्टीवर दुहेरी खर्च आणि जनतेच्या पैशांची उधळपट्टी आहे. शहरातील जलवाहिनीवरून पाण्याचा पुरवठा करण्यासाठी वेगळा खर्च. कार्यालयांत आणि सभांमध्ये जार व बिस्लरी पाण्याच्या खरेदीसाठी वेगळा लाखोंचा खर्च. विरोधी पक्ष भाजपा वेगवेगक्य मुद्यावर आंदोलन करत रस्त्यावर उतरते मग या पाण्याच्या मुद्द्यावर रस्त्यावर कधी उतरणार ? जर महानगरपालिकेचे पाणी खरोखरच पिण्यायोग्य आणि शुद्ध असेल, तर मग प्रशासनाने आणि सत्ताधाऱ्यांनी हा दुजाभाव तातडीने बंद करावा. महापालिकेच्या सर्वसाधारण सभा असोत वा विविध विभाग कार्यालये— बाहेरून आणले जाणारे जार आणि बिस्लरीचे पाणी तात्काळ बंद करण्यात यावे, जर प्रशासनाचा आपल्याच यंत्रणेवर आणि पाण्याचा शुद्धतेवर विश्वास असेल, तर सर्व अधिकारी आणि नगरसेवकांनी महापालिकेच्या नळाचे पाणी पिऊन दाखवावे.




