महाराष्ट्र खाकी (धाराशिव / विवेक जगताप ) – राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत चालणाऱ्या सर्व योजनांची आता कसोटी लागणार आहे! कोणतीही ढिलाई, निष्काळजीपणा किंवा उद्दिष्टे अपूर्ण राहणार नाही, असे कठोर निर्देश उपसंचालक आरोग्य सेवा, परिमंडळ लातूर रेखा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली १ जुलै रोजी झालेल्या जिल्हास्तरीय आरोग्य आढावा बैठकीत देण्यात आले. बैठकीत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांच्यासह सर्व वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, कार्यक्रम समन्वयक आणि विविध राष्ट्रीय कार्यक्रम अधिकारी उपस्थित होते. आगामी श्री आषाढी वारी पालखी सोहळा लक्षात घेता आरोग्य विभागाने पूर्ण तयारीत राहावे, असे बजावत उपसंचालक रेखा गायकवाड यांनी स्पष्ट सांगितले की, यावेळी कोणतीही चूक किंवा कमतरता सहन केली जाणार नाही!
कडक निर्देश
1) औषधसाठा, वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका, स्वच्छता व्यवस्था आणि पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता याबाबत शून्य सहनशीलता!
2) संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना तातडीने अमलात आणा.
3) माता-बाल आरोग्य सेवा, सार्वत्रिक लसीकरण, कुटुंब कल्याण कार्यक्रम यांच्या प्रगतीत कोणतीही आळशीपणा चालणार नाही.
4) शासनाने दिलेल्या उद्दिष्टांची पूर्ण पूर्तता झालीच पाहिजे, अन्यथा जबाबदारी निश्चित करण्यात येईल. ‘माझे गाव आरोग्यसंपन्न गाव’ या अभियानाला वेग द्या!
5) जिल्ह्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतींना पुरस्कारासाठी पात्र करा. लोकसहभाग वाढवा, आरोग्यदायी सवयी जनतेमध्ये रुजवा आणि आजार येण्यापूर्वीच प्रतिबंध करा, असे आक्रमक निर्देश यावेळी देण्यात आले.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास यांनीही सर्व अधिकाऱ्यांना स्पष्ट इशारा दिला की, आरोग्य सेवेची जबाबदारी हलक्यात घेण्याची वेळ आता संपली आहे. आषाढी वारीसारख्या मोठ्या सोहळ्यात लाखो वारकऱ्यांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा देणे हे आपले कर्तव्य आहे. त्यात कोणतीही कसूर झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर थेट कारवाई होईल. उपसंचालक रेखा गायकवाड आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास यांनी दिलेल्या या आक्रमक आणि कठोर निर्देशांमुळे धाराशिव जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा आता पूर्ण अलर्ट मोडवर आली आहे.



