महाराष्ट्र खाकी ( उमरगा / विवेक जगताप ) – लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून किरण उषा रविंद्र गायकवाड आज दि. २९ डिसेंबर २०२५ रोजी अधिकृतपणे पदभार स्वीकारणार आहेत. या निमित्ताने त्यांनी सर्व हितचिंतक, मित्रपरिवार व उमरगावासीयांना विनम्र आवाहन केले आहे.
आपण सर्वांच्या शुभेच्छा, आशीर्वाद व सहकार्यामुळेच या पदापर्यंत पोहोचता आल्याचे सांगत, नगराध्यक्ष गायकवाड यांनी पुढे स्पष्ट केले की, यापुढे कोणत्याही प्रकारचे सत्कार स्वीकारले जाणार नाहीत. नागरिकांनी सत्काराऐवजी वही, पेन किंवा इतर शैक्षणिक साहित्य आणावे, जे गरजू विद्यार्थ्यांना वाटप केले जाईल, अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे.
हा निर्णय सामाजिक बांधिलकी जपणारा व शिक्षणाला प्रोत्साहन देणारा असल्याने शहरातून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात सर्वांच्या सहकार्याने उमरगाच्या विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.


