महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप) – लातूर शहरात उभारण्यात आलेल्या एका युनिपोलवरून मोठा वाद निर्माण झाला असून, लातूरचे माजी खासदार डॉ. सुनील गायकवाड यांनी संबंधित युनिपोलचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत महानगरपालिका आणि युनिपोल चालकावर तीव्र रोष व्यक्त केला आहे. “हा काय प्रकार आहे? नट–बोल्टवर उभा केलेला हा युनिपोल म्हणजे सरळसरळ अपघाताला दिलेले खुले
निमंत्रण आहे,” अशा कडक शब्दांत त्यांनी प्रशासनावर घणाघात केला. आज हा युनिपोल उभा आहे, पण उद्या घाटकोपरसारखा भीषण हादसा होणार नाही, याची काय हमी, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. हा युनिपोल अत्यंत हलगर्जीपणे, कोणतेही सुरक्षिततेचे निकष न पाळता उभारण्यात आला असून, तो पाण्याच्या टाकीजवळ व नागरिकांची सतत वर्दळ असलेल्या ठिकाणी असल्याने धोका
अधिक गंभीर असल्याचे त्यांनी नमूद केले. ही बेफिकिरी म्हणजे सामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळ असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. जर उद्या कोणतीही दुर्घटना घडली, तर त्याला संपूर्णपणे महानगरपालिका जबाबदार असेल, असे स्पष्ट शब्दांत सांगत, अपघातानंतर चौकशी, निवेदनं व आश्वासनं देऊन मृतांच्या कुटुंबांना न्याय मिळत नसतो; अपघात होण्यापूर्वीच प्रतिबंध हाच खरा न्याय आहे, असेही त्यांनी
ठामपणे म्हटले आहे. माजी खासदार डॉ.सुनील गायकवाड यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा देत तात्काळ दखल घ्यावी, युनिपोलची सुरक्षिततेची तपासणी करावी, आणि गरज असल्यास तो त्वरित हटवावा, अशी ठाम मागणी केली आहे.“आज जर दुर्लक्ष झाले, तर उद्या एखाद्या निष्पापाचा जीव जाण्याची वेळ येऊ शकते — आणि ते पाप कुणालाही माफ होणार नाही,” असा इशारा देत त्यांनी प्रशासनाला तात्काळ जागे होण्याचे आवाहन केले आहे. जनतेचा जीव अमूल्य आहे — काही घडण्यापूर्वी जागे व्हा!


