महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – लातूर शहरात स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती १९ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहरातून निघालेल्या भव्य मिरवणुकीत पारंपारिक लोककला, ढोल-ताशांचा गजर आणि शिवभक्तांचा जल्लोष पाहायला मिळाला.
मात्र या साऱ्या उत्सवात शहरवासीयांचे विशेष लक्ष वेधून घेतले ते अवघ्या ३ वर्षांच्या विठू प्रतीक जाधव या चिमुकलीने. इतक्या लहान वयात तिने ज्या आत्मविश्वासाने आणि तालात ढोल वाजवला, ते पाहून उपस्थित नागरिक अक्षरशः थक्क झाले. मिरवणुकीत तिच्या प्रत्येक ठोक्यावर टाळ्यांचा कडकडाट होत होता.
शिवभक्तीची जणू सजीव झलकच या चिमुकलीत दिसत होती. विठूच्या चेहऱ्यावरची एकाग्रता, हातातील ताल आणि मनातील शिवप्रेम स्पष्ट जाणवत होते. उपस्थित शिवभक्तांच्या मते, “इतक्या कमी वयात अशी कला आणि निष्ठा दिसणे दुर्मिळ आहे; पुढे जाऊन विठू एक उत्कृष्ट ढोल वादक होईल.”
शिवजयंतीच्या उत्सवात या चिमुकलीने आपल्या छोट्या हातांनी मोठा ठेका देत सर्वांची मने जिंकली — आणि यंदाची जयंती लातूरकरांसाठी कायमची संस्मरणीय करून ठेवली.








