लातूरच्या रामलिंग मुदगड हत्याकांडाचा वेगवान तपास; पोलिसाकडून आरोपीला 48 तासात तात्काळ अटक

महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – लातूर जिल्ह्यातील रामलिंग मुदगड येथे घडलेल्या खळबळजनक हत्याकांडाचा पोलिसांनी अवघ्या 48 तासांत उलगडा करत मुख्य आरोपीला अटक केली आहे. या जलद व प्रभावी कारवाईमुळे स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेतीच्या वाटणीच्या वादातून सख्ख्या भावामध्ये तणाव निर्माण झाला होता. मृत तरुण गुलाब विलास खरोसे (वय 34) हा रात्री शेताकडे जात असताना आरोपी उल्हास खरोसे याने त्याच्यावर हल्ला करून दोरीने गळा आवळला व डोक्यात दगड मारून हत्या केली. त्यानंतर मृतदेह जवळील नाल्यात फेकून आरोपी फरार झाला.

घटनेची माहिती मिळताच कासार-शिरशी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि तपासाची चक्रे वेगाने फिरवली. लातूर LCB पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व कासार शिरशी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) प्रवीण राठोड यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या 48 तासांत आरोपीला ताब्यात घेतले.

या कारवाईत API गर्जे, PSI पाटील, हेड कॉन्स्टेबल पाटील, पोलीस अंमलदार आबासाहेब इंगळे व डावरगावे यांचा मोलाचा सहभाग होता. कौटुंबिक वादातून घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असली तरी पोलिसांच्या वेगवान कारवाईमुळे नागरिकांमध्ये विश्वास अधिक दृढ झाला आहे. पुढील तपास कासार-शिरशी पोलीस करत आहेत.

Recent Posts