महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – रविशंकर जाधव यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले, लातूर शहर महानगरपालिकेच्या हद्दीत चार झोन असून प्रत्येक झोनची स्वतंत्र इमारत आहे. या झोन कार्यालयांमार्फत कर संकलन, ८ अ व स्वच्छता विभागाची कामे केली जातात. मात्र, आजपर्यंत जन्म-मृत्यू विभाग केवळ मनपाच्या मुख्य इमारतीतच कार्यरत असल्यामुळे शहरातील नागरिकांना जन्माचा दाखला किंवा मृत्यू प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मुख्य कार्यालयातच जावे लागत होते. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत होती आणि एकाच कामासाठी अनेक हेलपाटे घालावे लागत असल्याने वेळेचीही नासाडी होत होती.
ही अडचण लक्षात घेऊन नगरसेवक रविशंकर जाधव यांनी ५ मार्च २०२५ रोजी महानगरपालिका आयुक्तांना पत्र देत झोन कार्यालयांमधूनच जन्म-मृत्यू प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यांच्या या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने महापालिकेशी पत्रव्यवहार करून शहरातील चारही झोनमध्ये जन्म-मृत्यू दाखले देण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे नागरिकांना आपल्या परिसरातच सेवा उपलब्ध होणार असून मनपा मुख्यालयाच्या फेऱ्यांतून मोठा दिलासा मिळणार आहे.
नगरसेवक रविशंकर जाधव यांच्या या लोकहिताच्या पुढाकाराबद्दल झोनमधील नागरिकांनी समाधान व्यक्त करत त्यांचे आभार मानले आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी घेतलेला हा निर्णय सकारात्मक आणि कौतुकास्पद मानला जात आहे.








