Home » राजकीय » आमदार अभिमन्यू पवारांच्या प्रयत्नांना यश: किल्लारी साखर कारखान्याच्या बळकटीकरणासाठी १८ कोटींच्या कर्जाचा मार्ग मोकळा

आमदार अभिमन्यू पवारांच्या प्रयत्नांना यश: किल्लारी साखर कारखान्याच्या बळकटीकरणासाठी १८ कोटींच्या कर्जाचा मार्ग मोकळा

महाराष्ट्र खाकी (औसा / विवेक जगताप ) – आमदार अभिमन्यू पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारा ‘श्री निळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखान्याला  एनसीडीसीकडून (NCDC) १८ कोटी रुपयांचे कर्ज घेण्यास मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आणि शेतकरी हितासाठी कटिबद्ध असलेले आमदार अभिमन्यू पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारा ‘श्री निळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखाना, किल्लारी’ हा राज्यातील सहकारातील एक आदर्श प्रकल्प ठरत आहे. १५ वर्षे बंद असलेला आणि ज्याची मशिनरी पूर्णपणे गंजली होती, अशा या कारखान्याचे खाजगीकरण करण्याचे अनेक प्रस्ताव असतानाही, केवळ आणि केवळ शेतकरी हित डोळ्यांसमोर ठेवून हा कारखाना सहकारातूनच पुनर्जीवित करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.

केंद्र व राज्य सरकारच्या (महायुती सरकार) सढळ सहाय्याने आणि आमदार अभिमन्यू पवार यांच्या पाठपुराव्यामुळे हा कारखाना पुन्हा धूर ओकू लागला आहे. शासनाच्या पहिल्या टप्प्यातील अर्थसहाय्यातून कर्जे व देयके चुकती करण्यात आली. तसेच कारखाना १२५0 मेट्रिक टन क्षमतेने चालवणे आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नसल्याने त्याची क्षमता वाढविण्यात आली. मागील गाळप हंगामात २.७० लाख मेट्रिक टन उसाचे यशस्वी गाळप करत शेतकऱ्यांना प्रति मेट्रिक टन २,७00 रुपयांचा पहिला आणि १०० रुपयांचा दुसरा हप्ता अतिशय वेळेवर देण्यात आला. आजूबाजूच्या इतर कारखान्यांचे ऊसबिले थकीत असल्याने शेतकऱ्यांना आंदोलनांची वेळ आलेली असताना किल्लारी कारखान्याने मात्र वेळेवर बिल देऊन आपली शेतकरीभिमुख कार्यपद्धती सिद्ध केली आहे.

कारखान्याचा भावी विकास आणि पूरक प्रकल्प
कारखान्याची वर्तमान स्थिती सुधारली असली तरी, स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी आणि कारखान्याला त्याचे गतवैभव मिळवून देण्यासाठी डिस्टलरी, सीबीजी (CBG), कोजन (Co-gen), सोलार प्रकल्प आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स यांसारख्या पूरक प्रकल्पांची उभारणी करणे गरजेचे होते. याच पार्श्वभूमीवर, किल्लारी कारखान्याचे बळकटीकरण करण्यासाठी आणि सभासद शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने विशेष बाब म्हणून कारखान्याला  एनसीडीसीकडून (NCDC) १८ कोटी रुपयांचे कर्ज घेण्यास मंजुरी दिली आहे. या महत्त्वपूर्ण व शेतकरी हिताच्या निर्णयामुळे कारखान्याच्या उज्वल भविष्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कारखान्याला मिळालेल्या या मोलाच्या सहकार्याबद्दल आदरणीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचे आमदार अभिमन्यू पवार व सभासद शेतकऱ्यांच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

Share This News

Related Post

National