महाराष्ट्र खाकी (औसा / विवेक जगताप ) – छावाचे प्रदेशाध्यक्ष आणि शेतकरी नेते विजयकुमार घाडगे पाटील यांचा शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेला अमरण उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा लातूर दौरा झाला. पण उपोषणस्थळी जाऊन शेतकऱ्यांना भेटण्याची आणि त्यांच्या वेदना ऐकण्याची हिंमत मुख्यमंत्र्यांनी दाखवली नाही.
फडणवीस यांनी थेट उपोषणस्थळी पाऊल ठेवण्याऐवजी औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांना पाठवले ? . आमदार अभिमन्यू पवार यांनी घाडगे पाटील यांना भेटून सांगितले की, “शेतकऱ्यांच्या मागण्यांवर ७२ तासांत जीआर काढण्यात येईल.”
यावर विजयकुमार घाडगे पाटील यांनी स्पष्ट भूमिका मांडली –“जीआर घेऊन या… मगच उपोषण सोडतो. शब्दांनी नाही, कागदावर निर्णय आला तरच शेतकरी समाधान मानेल”
मुख्यमंत्री लातूरला येतात, दौरा करतात, पण शेतकरी उपोषण करत असताना त्यांच्याकडे पाठ फिरवतात… ही शासनव्यवस्थेची खरी मानसिकता आहे का? शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर फक्त आश्वासने आणि ७२ तासांची मुदत… हेच पुरेसे आहे का ?
शेतकरी नेते घाडगे पाटील यांनी सरकारला थेट आव्हान दिले आहे “७२ तास पूर्ण झाले आणि जीआर आला नाही तर उपोषण आणखी तीव्र होईल ” शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारची ही उदासीनता आता उघड झाली आहे. फडणवीस सरकार शेतकऱ्यांना फक्त आश्वासनांची पुरणपोळी देत आहे की खरोखरच निर्णयाचे “तूप” देणार आहे… हे पुढील ७२ तासांत स्पष्ट होईल.




