Home » पोलीस » ACB NEWS पुणे महानगरपालिकेच्या भ्रष्ट डॉक्टरला ५० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ACB ठोकल्या बेड्या

ACB NEWS पुणे महानगरपालिकेच्या भ्रष्ट डॉक्टरला ५० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ACB ठोकल्या बेड्या

महाराष्ट्र खाकी (पुणे / विवेक जगताप) – पुणे महानगरपालिकेच्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी असलेल्या एका जबाबदार अधिकाऱ्यानेच पैशांसाठी बोगसगिरी आणि अरेरावी चालवल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. नगर रोड क्षेत्रीय कार्यालयातील क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी (वर्ग-२) डॉ. ज्ञानेश्वर शिवराम चकोर (वय ५०) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) तब्बल ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात बेड्या ठोकल्या आहेत. या धडक कारवाईमुळे पुणे महानगरपालिका वर्तुळात आणि आरोग्य विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

यातील तक्रारदाराचा वैद्यकीय व्यवसाय असून, त्यांनी पुसे महानगरपालिकेच्या नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाविरोधात हॉस्पिटलच्या कामातील अनियमिततेबाबत तक्रार अर्ज दिला होता. या अर्जाची चौकशी याच भ्रष्ट डॉक्टर ज्ञानेश्वर चकोरकडे होती. १८ सप्टेंबर २०२६ रोजी चकोरने तक्रारदाराच्या हॉस्पिटलला भेट दिली. यावेळी, “तुझ्या हॉस्पिटलच्या त्रुटींचे निराकरण करावे लागेल, नाहीतर हॉस्पिटलचे रजिस्ट्रेशन रद्द करण्यासाठी वरिष्ठांना अहवाल पाठवीन,” अशी भीती घालून सुरुवातीला तब्बल २० लाख रुपयांची मोठी लाच मागितली! एवढेच नव्हे तर, तडजोडीत त्यावेळी ३० हजार रुपये स्वीकारले व उर्वरित रकमेसाठी पैशांचा तगादा लावला.

या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) अधिकृत तक्रार नोंदवली. २४ सप्टेंबर रोजी करण्यात आलेल्या पंचासमक्ष पडताळणीमध्ये, डॉक्टर ज्ञानेश्वर चकोर याने त्याच्या साहेबांसाठी आणि स्वतःसाठी ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे व यापूर्वी १५ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आज, २६ सप्टेंबर २०२६ रोजी धानोरी, भैरवमन येथील तक्रारदाराच्या हॉस्पिटलमध्ये एसीबीने अत्यंत चलाखीने सापळा रचला. यादरम्यान, आरोपी लोकसेवक डॉ. ज्ञानेश्वर चकोर याने तक्रारदाराच्या केबिनमध्ये ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला बेड्या ठोकल्या. आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ अन्वये विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही धडक आणि यशस्वी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे सुसंवाद आणि अत्यंत सतर्कतेने पार पाडली. ही कारवाई शिरीष सरदेशपांडे पोलिस अधीक्षक, ला.प्र.वि., पुणे आणि अजित पाटील अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि., पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली; तसेच सतीश वाळके पोलिस उप अधीक्षक, ला.प्र.वि., पुणे – पर्यवेक्षण अधिकारी आणि श्रीमती निता मिसाळ पोलिस उप अधीक्षक, ला.प्र.वि., पुणे – सापळा अधिकारी  यांच्या नेतृत्वात पथकातील अंमलदार पो. हवा. प्रवीण ताबरे, म.पो.हवा. वनिता गोरे, पो. कॉन्. आश्विन कुमकर आणि चा.पो.कॉं. चंद्रकांत कदम यांनी अत्यंत यशस्वीरीत्या पार पाडली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून नागरिकांनी अशा प्रकारच्या लाचखोरांविरुद्ध पुढे येण्याचे आवाहन केले आहे.

Share This News

Related Post

National