Home » महाराष्ट्र » MLA Abhimnyu pawar औसा मतदारसंघातील पायाभूत सुविधांबाबत आमदार अभिमन्यू पवार यांच्या प्रयत्नांना मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद

MLA Abhimnyu pawar औसा मतदारसंघातील पायाभूत सुविधांबाबत आमदार अभिमन्यू पवार यांच्या प्रयत्नांना मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद

महाराष्ट्र खाकी (औसा / विवेक जगताप) – औसा विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना सुरक्षित, अखंड आणि सर्व ऋतूंमध्ये दळणवळणाची सुविधा उपलब्ध व्हावी तसेच शेतकरी व ग्रामीण भागाच्या विकासाला गती मिळावी, यासाठी सतत प्रयत्नशील असलेले आमदार अभिमन्यू पवार यांनी दोन महत्त्वाच्या पायाभूत कामांच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले. मुख्यमंत्र्यांनी या मागण्यांना अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित विभागांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या, असे आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगितले.

आमदार अभिमन्यू पावर यांनी या दोन प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या आहेत
१. मौजे अशिव ते भातांगळी रस्त्यावरील तब्बल ३० वर्षे जुन्या पाईप पुलाऐवजी नवीन उंच पुलाचे बांधकाम.
२. राज्य मार्ग क्र. २४२ वरील आलमला येथील तावरजा नदीवर पूल-कम-बंधारा मंजूर करून त्याचा डी.पी.आर.मध्ये समावेश.

अशिव-भातांगळी मार्गावरील विद्यमान पूल दरवर्षी पावसाळ्यात निम्न तेरणा प्रकल्पाच्या बॅकवॉटरमुळे पाण्याखाली जातो. त्यामुळे भातांगळी, कानेगाव, आर्णी, कमालपूर आणि कास्ती या गावांचा संपर्क पूर्णपणे तुटतो. नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व रुग्णांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागतो. याबाबत नागरिकांनी केलेल्या मागणीची दखल घेत आमदार अभिमन्यू पवार यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले आहे.

त्याचप्रमाणे आलमला येथील तावरजा नदीवर पूल-कम-बंधारा उभारल्यास पावसाळ्यात वाहतुकीची अडचण दूर होईल आणि नागरिकांना सुरक्षित व अखंड दळणवळणाची सुविधा मिळेल. शिवाय नदीतील पाण्याची साठवणूक वाढून भूजल पातळी सुधारेल, विहिरी व बोअरवेलना पाणी उपलब्ध होईल आणि परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठा लाभ मिळेल. यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री श्रीमंत शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेऊन डी.पी.आर.मध्ये या कामाचा समावेश करण्याची मागणीही केली आहे.

आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगितले की, या दोन्ही महत्त्वाच्या कामांचा सातत्याने पाठपुरावा करून ती लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे औसा मतदारसंघातील ग्रामीण भागाच्या विकासाच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल पडले असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.

Share This News

Related Post

National