Home » राजनीति » स्व. शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्मारकाचे राजकारण; लातूरच्या सुसंस्कृत राजकारणाला काळिमा फासणारी घटना – माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे

स्व. शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्मारकाचे राजकारण; लातूरच्या सुसंस्कृत राजकारणाला काळिमा फासणारी घटना – माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे

महाराष्ट्र खाकी ( लातूर / प्रतिनिधी ) – देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री, राज्यपाल, लोकसभा सभापती आणि लातूरचे माजी नगराध्यक्ष स्व. शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्मारकाबाबत सत्ताधाऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे लातूरच्या सुसंस्कृत राजकारणाला काळिमा फासला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते तथा माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केला आहे.

गोजमगुंडे यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्व. चाकूरकर यांनी आपल्या प्रदीर्घ सार्वजनिक जीवनातून लातूरचे नाव राष्ट्रीय पातळीवर गौरवाने उंचावले. अशा महान नेत्याचे स्मारक महापालिका आवारात किंवा शहरातील प्रमुख व सर्वसामान्य नागरिकांना सहज दिसेल अशा मध्यवर्ती ठिकाणी उभारण्यात यावे, ही लातूरकरांची रास्त आणि न्याय्य अपेक्षा आहे.

मात्र, सत्ताधाऱ्यांनी स्मारक शहराच्या प्रमुख ठिकाणी उभारण्याऐवजी आदर्श कॉलनीतील अंतर्गत भागात उभारण्याचा प्रस्ताव मांडून स्व. चाकूरकर यांच्या कार्याचा आणि जनभावनांचा अवमान करण्याचा प्रयत्न केला, असे गोजमगुंडे यांनी म्हटले. या संकुचित राजकीय भूमिकेला सभागृहात कडाडून विरोध होणार असल्याची जाणीव होताच, बहुमत असूनही कोणत्याही विषयावर चर्चा न करता सभागृहातून काढता पाय घेण्यात आला. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून लातूरच्या सुसंस्कृत राजकारणाला काळिमा फासणारी आहे, असा आरोप त्यांनी केला.

स्व. शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्मारकाचा विषय हा राजकारणाचा नव्हे, तर लातूरच्या अस्मितेचा आणि त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्याचा विषय आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी या विषयावर राजकारण न करता जनभावनांचा आदर करावा, असे आवाहन गोजमगुंडे यांनी केले.

त्यांनी स्पष्ट केले की, स्व. चाकूरकर यांचे स्मारक शहरातील प्रमुख व सन्माननीय ठिकाणी उभारले जाईपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शांत बसणार नाही आणि जनतेच्या भावनांसाठी लोकशाही मार्गाने सातत्याने लढा देत राहील.

Share This News

Related Post

National