महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – लातूर जिल्हा शिक्षण क्षेत्रात ‘लातूर पॅटर्न’ म्हणून ओळखला जातो, पण याच पॅटर्नमध्ये एक घाणेरडा ‘नियमभंग पॅटर्न’ही रुजला आहे. शासकीय नियम, कायदे आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी फसवणूक करणाऱ्या अनेक ‘शिक्षण संस्था’ वर्षानुवर्षे निमूटपणे चालू आहेत. लातूर जिल्हा शिक्षण विभागाचे अधिकारी मात्र ‘चित्रीमिरी’ घेऊन अर्थपूर्ण दुर्लक्ष करत आहेत. विद्यार्थ्यांच्या शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षिततेची पायमल्ली होत असताना कोणतीही कारवाई होत नाही. फक्त फाईल फिरवणे आणि गप्प बसणे हाच येथील ‘पॅटर्न’ झाला आहे.
नियमभंगाची यादी
१. शाळांची नियमभंग इमारत – अनेक संस्थांच्या शाळा इमारती जीवघेण्या अवस्थेत आहेत. भिंती तडकलेल्या, छत गळणारे, विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून बसावे लागते. शासकीय निकष पूर्ण करणारी एकही इमारत नाही, तरीही शाळा चालू!
२. विद्यार्थ्यांसाठी मैदान नाही – खेळाचे मैदान, खेळण्याची जागा शून्य. मुले रस्त्यावर किंवा शेजारच्या ओसाड जागेत खेळतात. शारीरिक विकास तर दूरच, अपघाताची भीती सदैव डोक्यावर.
३. U-DISE वर नोंद नाही – शासकीय डेटाबेस U-DISE वर या संस्था दिसतच नाहीत. तरीही शाळा चालवून सरकारी अनुदान आणि सवलती लुटल्या जात आहेत. हा सरळ सरकारी फसवणूक नाही तर काय?
४. शालेय पोषण आहाराची लूट – विद्यार्थ्यांसाठी येणारा तांदूळ, धान्य नियमित वाटप केले जात नाही. मोठ्या प्रमाणात काळ्या बाजारात विकला जातो. गरीब विद्यार्थ्यांना उपाशी ठेवून ‘शिक्षण संस्था’ मालकांचे पोट भरले जाते. ही केवळ लूट नाही, तर मुलांच्या आरोग्याशी खेळ आहे!
५. अपंग विद्यार्थ्यांसाठी शून्य व्यवस्था – दिव्यांग मुलांसाठी रॅम्प, विशेष शिक्षक, साहित्य किंवा कोणतीही सुविधा नाही. समावेशक शिक्षणाचा तर प्रश्नच नाही. ही सरकारी योजनांची थट्टा आहे.
ही यादी अजून लांब आहे. वर्षानुवर्षे ही पायमल्ली सुरू आहे. शिक्षण विभागातील कोणते अधिकारी याला जबाबदार आहेत? कोणत्या ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्षामुळे या संस्था मजबूत होत आहेत? लातूर शिक्षण विभागाचे अधिकारी कोणत्या ‘चित्रीमिरी’मुळे गप्प आहेत? महाराष्ट्र खाकी यांचे नाव, पद आणि भूमिका उघड करेल. जिल्हाधिकारी भारत बास्टेवाड आता तरी लक्ष घालाल का? लातूर जिल्ह्यातील या नियमभंग शाळांवर तात्काळ कारवाई करा. अनधिकृत, नियमबाह्य संस्था बंद करा, दोषींवर गुन्हे दाखल करा आणि विद्यार्थ्यांचे हक्क सुनिश्चित करा. फक्त फाईल फिरवून किंवा ‘तपास’ च्या नावाखाली वेळ काढून चालणार नाही. जनतेला उत्तर द्या. विद्यार्थी, पालक आणि शिक्षणप्रेमी नागरिकांनो, आपल्या मुलांच्या भवितव्याशी होणाऱ्या या खेळाला थांबवा. माहिती द्या, पुरावे द्या. एकत्र लढा.




