महाराष्ट्र खाकी ( लातूर / प्रतिनिधी ) – लातूर जिल्ह्यात 17 व 18 मार्च रोजी अवकाळी पाऊस, गारपिटीने शेतपिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे तातडीने करून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले. लातूर जिल्ह्यात गारपीट, अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्याची माहिती
मिळताच पालकमंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने लातूर येथे येवून नुकसानीचा आढावा घेतला. तसेच प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जावून नुकसानीची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांकडून नुकसानीची माहिती घेतली. या अस्मानी संकटाच्या काळात राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून तातडीने मदत देण्याची
कार्यवाही केली जाणार असल्याचे सांगून त्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला. लातूर जिल्ह्यात 17 मार्च रोजी झालेल्या अवकाळी पावसाने देवणी तालुक्यात सुमारे एक हजार 67 हेक्टर, अहमदपूर तालुक्यात सुमारे आठ हेक्टर आणि जळकोट तालुक्यात सव्वाचार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तसेच
18 मार्च रोजी झालेल्या गारपीट, अवकाळी पावसाने जिल्ह्यातील इतरही तालुक्यांमधील शेतपिकांचे नुकसान झाले असून जिल्ह्यात ज्वारी, हरभरा सारख्या पिकांसह आंबा, द्राक्षेसारख्या फळबागांचेही नुकसान झाले आहे. गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतपीक नुकसानीचे पंचनामे तत्काळ सुरु करण्याचे आदेश सर्व
संबंधित अधिकाऱ्यांना दिले. पंचनामे करताना एकही नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या.