गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गडचिरोली पोलीस दलातील सी-60 जवानांचे विशेष अभिनंदन केले.


  महाराष्ट्र खाकी ( गडचिरोली ) – उपविभाग कुरखेडा अंतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केंद्र मालेवाडा हद्दीत गडचिरोली पोलिसांनी विशेष मोहीम राबवून नक्षलवाद्यांचा खात्मा केला. यावेळी झालेल्या चकमकीत नक्षलवाद्यांच्या वरिष्ठ जहाल नेत्यासह पाच नक्षलवादी ठार झाले. या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गडचिरोली पोलीस दलातील सी-60 जवानांचे विशेष अभिनंदन केले.
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) मनीष कलवानीया, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी (अभियान) भाऊसाहेब ढोले यांनी नक्षलविरोधी अभियानाची आखणी केली. त्यानुसार श्री.कलवानिया यांच्या नेतृत्वाखाली मौजा खोब्रामेंढा जंगल परिसरात गडचिरोली पोलीस दलातील सी-60 च्या जवानांनी नक्षलविरोधी कारवाई सुरु केली. त्यावेळी जंगलात दबा धरून बसलेल्या 40 ते 50 नक्षलवाद्यांनी जवानांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला. पोलिसांनी नक्षलवाद्यांना त्यांच्या हातातील शस्त्र खाली ठेवून शरण येण्याबाबत आवाहन केले. मात्र नक्षलवाद्यांनी शरण न येता पोलिसांवर आणखी जोरदार हल्ला चढविला. सी-60 जवांनानी प्रत्युत्तरादाखल व स्वरक्षणासाठी नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. सुमारे दोन ते अडीच तास चाललेल्या या चकमकीत नक्षलवाद्यांनी पोलिसांचा वाढता दबाव पाहून घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरुन पळ काढला. चकमकीनंतर जंगल परिसरात सी-60 जवानांनी शोध अभियान राबविले असताना घटनास्थळी 3 पुरुष नक्षलवादी व 2 महिला नक्षलवाद्यांचे मृतदेह मिळून आले असून मृतक नक्षलवाद्यांची ओळख पटली आहे.


43 लाख रुपयांचे बक्षीस

मृतक नक्षलवाद्यांवर जवळपास 43 लाख रुपयांचे बक्षीस होते. पोलिसांनी घेतलेल्या शोध मोहिमेत सदर घटनास्थळी एक एके-47 रायफल, एक 12 बोअर रायफल, एक 303 रायफल, एक 8 एमएम रायफल तसेच मोठ्या प्रमाणात नक्षलवाद्यांच्या दैनंदिन वापराचे साहित्य मिळून आले. मृत नक्षलवाद्यांची ओळख पुढील प्रमाणे आहे.

1) रुषी रावजी ऊर्फ पवन ऊर्फ भास्कर हिचामी वय-46 वर्ष रा. जवेली (बु.) पोस्टे जारावंडी (डीकेएसझेडसीएम) टिपागड एलओएस पदावर कार्यरत होता. याच्यावर एकूण- 155 गुन्हे दाखल असुन यात खुनाचे- 41 गुन्हे, चकमकीचे – 78 गुन्हे, दरोडा-1 विविध जाळपोळीचे- 16 गुन्हे, व इतर-19 अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. शासनाने त्याचेवर एकूण 25 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

2) राजु ऊर्फ सुखदेव बुधेसींग नैताम वय-32 वर्ष रा. मरकेगाव पोमके सावरगाव टिपागड एलओस उपकंमाडर या पदावर कार्यरत होता. एकूण- 14 गुन्हे दाखल असून यात खुनाचे- 05 गुन्हे, चकमकीचे – 03 गुन्हे, जाळपोळीचे- 03 गुन्हे, दरोडा-01 व इतर -02 असे गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. शासनाने त्याचेवर एकूण 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

3) अमर मुया कुंजाम वय-30 वर्ष रा. जागरगुडा बस्तर एरीया (छ.ग.) पार्टी मेंबर कसनसुर एलओएस या पदावर याच्यावर एकूण- 11 गुन्हे दाखल असुन यात चकमकीचे 08 गुन्हे व इतर -03 असे गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. शासनाने त्याचेवर एकूण 02 लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

4) सुजाता ऊर्फ कमला ऊर्फ पुनीता गावडे ऊर्फ आनाम वय-38 वर्ष रा. कापेवंचा उपपोस्टे राजाराम (खां.) टिपागड एलओएस प्लाटुन क्र. 15 ची पार्टी मेंबर हिचेवर एकूण- 31 गुन्हे दाखल असुन यात खूनाचे- 11 गुन्हे, चकमकीचे – 11 गुन्हे, व इतर -09 असे गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. शासनाने हिचेवर एकूण 04 लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

5) अस्मिता ऊर्फ सुखलु पदा वय – 28 वर्ष रा. गुर्रेकसा पोमके कटेझारी टिपागड एलओएस पार्टी मेंबर हिचेवर एकूण-11 गुन्हे दाखल असुन यात खूनाचे- 01 गुन्हे, चकमकीचे – 05 गुन्हे, जाळपोळीचे- 02 गुन्हे व इतर – 03 असे गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. शासनाने हिचेवर एकूण 02 लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

Recent Posts