अत्याधुनिक सुविधा पुरविल्यास पोलीस दल अधिक कार्यक्षमतेने काम करेल – पालकमंत्री जयंत पाटील

महाराष्ट्र खाकी (सांगली)  –  लॉकडाऊन काळात कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी अत्यंत चांगले काम केले आहे. समाजाची गरज ओळखून पोलीस काम करत असतात. संपूर्ण समाजावर नियंत्रण ठेवण्याचे काम करतात. कोरोना काळापासून पोलिसांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदललेला आहे. पोलिसांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना चांगला आधार दिल्यास व चांगली अत्याधुनिक सुविधा दिल्यास ते अधिक कार्यक्षमतेने काम करतील, असे प्रतिपादन पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले. जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त निधीमधून पोलीस दलाने २५ स्कॉर्पिओ जीप तसेच ५० मोटरसायकल खरेदी केल्या. या वाहनांचे लोर्कापण पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते पोलीस मुख्यालय सांगली येथील मैदानावर करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, आमदार अरूण लाड, आमदार डॉ. सुरेश खाडे, आमदार अनिल बाबर, आमदार सुमनताई पाटील, महापौर दिग्विजय सुर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी, जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अपर पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले, पोलीस उपअधीक्षक किशोर काळे आदि उपस्थित होते.पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, जिल्हा नियोजनच्या निधीतून पोलिसांची गरज लक्षात घेऊन २५ स्कॉर्पिओ जीप तसेच ५० मोटरसायकल पुरविल्या आहेत. पोलिसांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी त्यांना विविध अत्याधुनिक सुविधा देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर त्यांच्या आरोग्याबाबतही सतर्क असणे आवश्यक आहे. पोलिसांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना चांगला आधार दिल्यास त्यांना चांगली अत्याधुनिक सुविधा दिल्यास ते अधिक कार्यक्षमतेने काम करतील. इस्लामपूर व विटा शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था व गुन्हेगारी रोखण्यास चांगली मदत होणार आहे. पुढील काळात इतर शहरातही सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा मानस व्यक्त करून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, सीसीटीव्हींची संख्या वाढविणे आवश्यक असून पोलिसांची नजर नाही असा एकही शहराचा कोपरा राहू नये अशी व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे. पोलीस दलाने आधुनिकीकरणाकडे पाऊल टाकले आहे.

पोलीस दलासाठी जे आवश्यक आहे त्याची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करू. विविध सोयी सुविधांच्या माध्यमातून पोलीस चुकीच्या व्यवसाय / प्रवृत्तीवर अंकूश ठेवून अधिक कार्यक्षमतेने काम करतील अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.  सांगली शहरातील प्रत्येक बीटवर गस्त घालण्यासाठी नेमण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा संपर्क क्रमांक संबंधित भागातील नागरिकांना द्यावा. त्यामुळे नागरिकांना तात्काळ त्यांच्याशी संपर्क साधता येईल व पोलीस घटनास्थळी तात्काळ पोहोचतील. असे झाल्यास पोलीसांची वचकही निर्माण होईल, असे ते म्हणाले.

सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम म्हणाले, पोलीस दलासाठी हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. अत्याधुनिक वाहनाबरोबर सीसीटीव्हीच्या माध्यमातून लोकांचे संरक्षण करण्यासाठी चांगली मदत होणार आहे. पुढील काळात आणखी जुनी वाहने बदलण्यासाठी प्रयत्नशील राहू. पोलिसांच्यावर शारिरीक तसेच मानसिक ताण असतो. त्यांची आरोग्य तपासणी वेळोवेळी करणे गरजेचे असून त्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यासाठी भारती विद्यापीठ पुढाकार घेईल, असे ते म्हणाले. आमदार अनिल बाबर म्हणाले, पोलीस दलास आधुनिकतेची गरज अत्यावश्यक आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीसांचे नियंत्रण राहून त्यांची कार्यक्षमता वाढेल त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेची गुणवत्ता वाढेली अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी म्हणाले, महानगरपालिका हद्दीत सांगली व मिरज शहरात गतवर्षीच सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून आता इस्लामपूर व विटा शहरातही सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. पुढील काळातही ज्या शहरामध्ये सीसीटीव्ही बसवायचे आहेत त्यासाठी सन 2021-22 साठी जिल्हा नियोजन मध्ये आवश्यक निधीची तरतूद केली आहे. त्यामुळे गुन्हेगारी रोखण्यासाठी व कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी याचा पोलीस दलाला चांगला फायदा होणार असल्याचे ते म्हणाले. नविन पुरविण्यात आलेल्या वाहनांमुळे पोलीसांच्या कार्यक्षमतेत वाढ होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
प्रास्ताविकात जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी नवीन वाहने तसेच इस्लामपूर व विटा शहरात सीसीटीव्ही कॅमेराचे लोर्कापण याबाबत सविस्तर माहिती देऊन पोलीस दलाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. प्रारंभी स्कॉर्पिओ वाहन चावी, हेल्मेट व बॉडी कॅमेरा प्रदान, पोलीस पाल्यांना खाजगी उद्योजकांकडील नियुक्ती पत्र व उद्योजकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमानंतर मान्यवरांच्या हस्ते वाहन पूजन करून हिरवा झेंडा दाखवून वाहन संचलन करण्यात आले. तसेच पोलीस मुख्यालय येथील सीसीटीव्ही कंट्रोल रूमला भेट देवून तेथील व्यवस्थेची पहाणी मान्यवरांनी केली.
या कार्यक्रमास पोलीस विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब माळी यांनी केले तर आभार अप्पर पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले यांनी मानले

Recent Posts

कुटुंबातील आणि मित्र परिवारातील प्रत्येक मतदाराला 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदानासाठी प्रोत्साहित करावे – जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर – घुगे