महाराष्ट्र खाकी ( जालना / विवेक जगताप ) – गरीब आणि सर्वसामान्यांच्या हक्काच्या रेशनिंगवर डल्ला मारणाऱ्या एका स्वस्त धान्य दुकानदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) जालना पथकाने दणका दिला आहे. बंद असलेले रेशन कार्ड पुन्हा चालू करून त्यावर धान्य चालू करण्यासाठी चक्क २ हजार रुपयांची लाच उकळणाऱ्या दुकानदाराला एसीबीच्या पथकाने रंगेहात बेड्या ठोकल्या आहेत!
शैलेश जीवनलाल कक्कड (वय ४९ वर्षे, व्यवसाय: स्वस्त धान्य दुकान चालक, रा. शास्त्री मोहल्ला, जुना जालना) असे या लाचखोर दुकानदाराचे नाव आहे.
काय आहे नेमकी घटना
तक्रारदार हे ७१ वर्षीय वृद्ध असून ते रोज मजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवतात. त्यांचे रेशन कार्ड बंद झाले होते. हे बंद रेशन कार्ड पुन्हा चालू करून त्यावर नियमित धान्य सुरू करण्यासाठी आरोपी दुकानदार शैलेश कक्कड याने त्यांच्याकडे २ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
लाचलुचपत विभागाची धडक कारवाई
गरीब मजुराकडून लाच मागितल्याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना येथे ९५/०९/२०२६ रोजी लेखी तक्रार दिली. या तक्रारीची खातरजमा केली असता, आरोपी दुकानदाराने पंचसमक्ष रेशन कार्ड चालू करून धान्य देण्यासाठी २ हजार रुपयांची मागणी करून ती स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आज दिनांक १५/०९/२०२६ रोजी भवानी नगर, जुना जालना येथील स्वस्त धान्य दुकान क्र. ६८ मध्ये सापळा रचण्यात आला. या सापळा कारवाई दरम्यान आरोपी शैलेश कक्कड याने तक्रारदाराकडून पंचसमक्ष २ हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात ताब्यात घेतले. पोलिसांनी या प्रकरणी पोलीस ठाणे कदीम जालना येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजीनगर श्रीमती माधुरी केदार कांगणे, अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपअधीक्षक बी.एस. जाधव व त्यांच्या पथकातील (पो.ह. गजानन घायवट, पोअं. मनोहर भुतेकर, गणेश चेके, अमोल चेके, शिवलिंग खुळे, पो.हवा. बालचंद्र बिनोरकर) यांच्या पथकाने पार पाडली.




