महाराष्ट्र खाकी (मुंबई / विवेक जगताप ) – अंधेरीत विवाह प्रमाणपत्रासाठी २ हजारांची लाच घेताना महापालिका लिपिक एसीबीच्या जाळ्यात, विवाहाचे नोंदणी व प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात शासकीय शुल्काव्यतिरिक्त लाच मागणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (के/पश्चिम वॉर्ड, अंधेरी) आरोग्य खात्यातील एका लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले आहे.
आरोपी लिपिकाचे नाव स्वप्नील म्हात्रे असून, या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकरणाची पार्श्वभूमी
तक्रारदार २४ वर्षीय तरुण आहे त्याला विवाहाचे प्रमाणपत्र हवे होते. त्यासाठी तो के/पश्चिम वॉर्ड, अंधेरी येथील आरोग्य खात्यात गेला. तिथे कार्यरत लिपिक स्वप्नील म्हात्रे याने ७ सप्टेंबर २०२६ रोजी शासकीय शुल्काव्यतिरिक्त १,५०० रुपयांच्या लाचेची मागणी केली. लाच देण्याची अजिबात इच्छा नसल्याने तक्रारदाराने ८ सप्टेंबर २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई विभागाकडे तक्रार नोंदवली. त्याच दिवशी पंचांसमोर पडताळणी करण्यात आली. यावेळी आरोपीने तक्रारदाराकडे २,००० रुपयांच्या लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याचे मान्य केल्याचे स्पष्ट झाले.
सापळा आणि कारवाई
९ सप्टेंबर २०२६ रोजी एसीबीने पंचांच्या उपस्थितीत सापळा रचला. आरोपी स्वप्नील म्हात्रे याने ठरल्याप्रमाणे २,००० रुपयांची लाच स्वीकारताच त्याला के/पश्चिम वॉर्डच्या आरोग्य खात्याच्या कार्यालयात रंगेहात अटक करण्यात आली. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २६/२०२६ अंतर्गत भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त संदिप दिवान अपर पोलीस उप आयुक्त, अनिल घेरडीकर आणि अपर पोलीस उप आयुक्त, अनंत साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहायक पोलीस आयुक्त (पर्यवेक्षक अधिकारी) हरिदास किल्लेदार आणि पोलीस निरीक्षक श्रीमती रेखा काळे (सापळा अधिकारी) यांच्या पथकाने केली. या पथकात स.पो.उप.इ./पो.ह./पो.शि. (नावं: चव्हाण, गायकवाड, तोडणकर, राणे, नलावडे, गायकवाड, पुळणकर, देसाई) यांचा समावेश होता. पुढील कायदेशीर तपास सुरू आहे.




