Home » महाराष्ट्र » लातूरच्या माजी खासदाराच्या सामाजिक कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल : मा. खा.डॉ. सुनील गायकवाड यांना ‘भारत सन्मान २०२६’

लातूरच्या माजी खासदाराच्या सामाजिक कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल : मा. खा.डॉ. सुनील गायकवाड यांना ‘भारत सन्मान २०२६’

महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – लातूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार, सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता, शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते प्रा. डॉ. अॅड. सुनील बळीराम गायकवाड यांच्या दीर्घकालीन सामाजिक, संसदीय आणि लोकहिताच्या कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेत त्यांची प्रतिष्ठित ‘भारत सन्मान २०२६’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. बुद्धांजली रिसर्च फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई यांच्या वतीने हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे.

आयोजकांनी पाठविलेल्या निमंत्रणानुसार, १२ ऑगस्ट २०२६ रोजी नवी दिल्ली येथील कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया येथे विशेष सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ‘वंदे मातरम्’च्या १५० व्या वर्धापनदिनानिमित्त आणि भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने हा राष्ट्रीय पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. डॉ. गायकवाड यांनी २०१४ ते २०१९ या कालावधीत लातूरचे खासदार म्हणून संसदेत प्रभावी कामगिरी केली. शंभर टक्के उपस्थिती, लोकहिताचे प्रश्न प्रभावीपणे मांडणे तसेच सामाजिक न्याय, शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांबाबत सातत्याने पाठपुरावा करणे यामुळे त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली.

खासदारपदाच्या काळात त्यांनी लातूर जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविले. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पासपोर्ट सेवा केंद्र, NEET परीक्षा केंद्र, रेल्वे विकास, राष्ट्रीय महामार्गांची कामे, खासदार निधीतून शेकडो पिण्याच्या पाण्याच्या बोअरवेल, गंभीर आजारांवरील रुग्णांना केंद्र शासनाच्या निधीतून मदत, कलावंतांना मानधन मिळवून देण्यासाठी प्रयत्न तसेच विविध विकासकामांसाठी सातत्याने पाठपुरावा करून त्यांनी लातूरच्या सर्वांगीण विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले. संसदेबरोबरच त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताचे प्रतिनिधित्व केले. चिली येथे आयोजित वर्ल्ड ई-पार्लमेंट परिषद तसेच भूतानमधील सामाजिक न्याय परिषदेत भारताची भूमिका प्रभावीपणे मांडली.

राजकारणाबरोबरच शिक्षण व न्यायक्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे. कायद्याचे शिक्षण पूर्ण करून ते आज सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता म्हणून कार्यरत असून समाजातील वंचित, शोषित आणि दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. या सर्व सामाजिक, संसदीय, शैक्षणिक आणि न्यायक्षेत्रातील योगदानाची दखल घेत ‘भारत सन्मान २०२६’ पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आल्याचे निमंत्रणपत्रात नमूद करण्यात आले आहे. या सोहळ्यास केंद्रीय मंत्री, संसद सदस्य, आयएएस, आयपीएस, आयआरएस अधिकारी तसेच देशभरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांच्या या राष्ट्रीय सन्मानाबद्दल लातूरसह राज्यभरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि कायदे क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला असून, त्यांच्या कार्याचा हा गौरव असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

Share This News

Related Post

National

“सातत्याने कामात राहणारे आणि कामाचा माणूस अशी ओळख असणाऱ्या स्व. अजित दादा पवार यांना छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिरातुन खऱ्या अर्थाने भावपूर्ण आदरांजली – माजी महापौर व नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे