महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – लातूर शहर महानगरपालिकेच्या कारभारावर माजी महापौर तथा नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. नाल्या तुंबून रस्त्यांवर पाणी आल्यानंतर झाडूने पाणी काढण्याची पद्धत वापरणारी लातूर मनपा कदाचित देशात एकमेव ठरेल, अशी तीव्र टिका करत त्यांनी व्हिडिओ शेअर केला आहे.
“नाल्या तुंबून पाणी रस्त्यावर आल्यानंतर अशा पद्धतीने पाणी काढणारी लातूर शहर महानगरपालिका ही कदाचित एकमेव ठरावी. थोडासा जरी मोठा पाऊस झाला तरीही लातूर मनपाचे नाले सफाईचे पितळ उघडे पडत आहे. शहरातील अनेक भागात अशीच परिस्थिती पाहायला मिळते,” असे गोजमगुंडे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
सम्राट चौक, सिल्वर ज्युबिली रोड, आंबेजोगाई रोड आणि रिंग रोड या प्रमुख भागांमध्येही हीच दयनीय अवस्था आहे. थोडासा पाऊस पडला की नाल्यांचा कचरा आणि गाळ बाहेर येतो, रस्ते पाण्याखाली जातात आणि प्रशासन नंतर सफाई कर्मचारी लावून झाडूने पाणी काढण्याचा नाट्यमय प्रयोग करतो. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करायची, गाळ काढायचा, कचरा दूर करायचा हे मूलभूत कामच मनपाने केले नाही, हेच यातून स्पष्ट होते.
दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करूनही नालेसफाई अर्धवट किंवा कागदावरच राहते. नागरिकांना त्रास होतो, वाहतूक ठप्प होते, आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात आणि प्रशासन मात्र आरामखुर्चीवर बसून राहते. विक्रांत गोजमगुंडे यांनी व्हिडिओद्वारे ही लाजिरवाणी स्थिती समोर आणली आहे. मनपा प्रशासनाने यावर तात्काळ उत्तर द्यावे आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र खाकी शी बोलताना विक्रांत गोजमागुंडे यांनी केली आहे. लातूरकरांना आता फक्त पाऊस येण्याची भीती नाही, तर मनपाच्या नालेसफाईच्या अपयशाची भीती आहे असे वाटत आहे असेही गोजमगुंडे म्हणाले.




