महाराष्ट्र खाकी ( रेनापूर / विवेक जगताप ) – शेतकऱ्यांच्या कष्टाची कमाई लुटणाऱ्या चोरट्यांवर लातूर पोलिसांची कठोर कारवाई सुरू असताना, रेणापूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधाकर देडे यांनी आपल्या कर्तव्यदक्षतेने एका चोरी प्रकरणाचा लवकरात लवकर छडा लावला आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अवघ्या काही तासांत दोन आरोपींना अटक करत ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या स्पष्ट सूचनांनुसार शेतकऱ्यांच्या कृषी साहित्य, पाण्याच्या मोटारी व तांब्यााच्या वायरच्या चोरीच्या प्रकरणांना प्राधान्याने हाताळण्याचे निर्देश दिले गेले होते. या अनुषंगाने रेणापूर पोलिसांनी तातडीने हालचाल केली. आरोपी समीर आजम पठाण (वय २०, रा. अंजली नगर, लातूर) व रेहान नौशाद शेख (वय २०, रा. संजय नगर, लातूर) यांनी रेणापूर येथील रेणा बॅरेज परिसरातील शेतशिवारातून एका शेतकऱ्याच्या पाण्याच्या मोटारीचा तांब्याचा वायर चोरला होता.

पोलीस निरीक्षक सुधाकर देडे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने तपासात वेग आणला आणि आरोपींना जेरबंद केले. आरोपींकडून चोरीचा ५,००० रुपयांचा तांब्याचा वायर व गुन्ह्यात वापरलेली स्प्लेंडर मोटारसायकल (MH-24-CC-8045) अंदाजे ३०,००० रुपयांची जप्त करण्यात आली. एकूण ३५,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून संबंधित शेतकऱ्याला परत मिळवून देण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या यशस्वी कारवाईबद्दल अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनीही पोलीस निरीक्षक सुधाकर देडे व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले आहे. शेतकऱ्यांच्या उपजीविकेच्या साधनांवर होणाऱ्या हल्ल्यांना पोलिसांकडून तत्काळ प्रत्युत्तर मिळत असल्याचे यामुळे दिसून आले आहे.
सुधाकर देडे यांच्या अशा सातत्यपूर्ण व तत्पर कारवायांमुळे रेणापूर परिसरातील शेतकरी वर्गात पोलिसांबद्दल विश्वास वाढला आहे. शेतकऱ्यांच्या हितरक्षणासाठी त्यांच्यासारख्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची कर्तव्यदक्षता ही खऱ्या अर्थाने प्रशंसनीय आहे.



