महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – लातूर शहराचा आत्मा मानल्या जाणाऱ्या ट्युशन एरिया परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, विद्यार्थ्यांना सुरक्षित व शांत शैक्षणिक वातावरण मिळावे यासाठी प्रभाग १५ च्या नगरसेविका प्रेरणा होनराव यांनी अष्टविनायक मंदिराशेजारील पोलीस चौकीत पोलीस अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा केली. परिसरातील परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील काळात कायदा व सुव्यवस्था कडक ठेवण्याबाबत नियोजनही करण्यात आले. या उपक्रमाबद्दल नागरिकांकडून त्यांचे स्वागत व अभिनंदन केले जात आहे.
मात्र याच ट्युशन एरियात सुरू असलेल्या काही मोठ्या बांधकामांबाबत आता प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेषतः आरसीसी क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांच्या शिक्षण संस्थांशी संबंधित सुरू असलेल्या बांधकामांबाबत प्रेरणा होनराव चर्चा करणार का? , असा प्रश्न परिसरातील नागरिक विचारत आहेत.
ट्युशन एरियासह लातूर शहरात मोटेगावकर यांच्या काही मोठ्या बांधकामांचे काम सुरू आहे. त्यामुळे या बांधकामांची मनपा नगररचना विभाग, महापौर किंवा आयुक्तांकडून चौकशी होणार का, तसेच ती अधिकृत आहेत की अनधिकृत याबाबत स्पष्टता आणण्यासाठी नगरसेविका प्रेरणा होनराव पुढाकार घेतील का? , याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ट्युशन एरियात कायदा-सुव्यवस्था राखण्याबरोबरच बांधकाम नियमांचाही कठोरपणे अंमल होणे आवश्यक असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. त्यामुळे मोटेगावकर यांच्या बांधकामांबाबत चौकशी करून आवश्यक असल्यास कारवाई करण्याचे धाडस प्रेरणा होनराव दाखवतील का, की राजकीय समीकरणांमुळे किंवा दोघेही एकाच म्हणजे शिक्षण क्षेत्राशी संबंधित असल्यामुळे हा मुद्दा दुर्लक्षित करणार, असा थेट प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.







