महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – समाजपरिवर्तन, स्त्री-सक्षमीकरण आणि ग्रामीण विकासासाठी आयुष्य झोकून देणाऱ्या सुमतीताई जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्याचा गौरव सर्वत्र होत आहे. स्वातंत्र्यलढ्याच्या बलिदानी परंपरेतून आलेल्या सुमतीताईंनी समाजसेवेचा दीप अखंड तेवत ठेवत महाराष्ट्रातील शेकडो गावांमध्ये परिवर्तनाची नवी दिशा दिली आहे.
त्यांच्या कुटुंबाचा स्वातंत्र्यलढ्याशी घट्ट संबंध होता. वडील भाई बन्सीलालजी आणि काका बॅ. श्यामलालजी यांनी हैदराबाद मुक्तीसंग्रामात सक्रिय सहभाग घेत समाजप्रबोधनाची चळवळ उभी केली. त्याग आणि समतेच्या या विचारांचा ठसा सुमतीताईंच्या आयुष्यावर उमटला आणि त्यांनी तोच वारसा पुढे नेला. पती प्रा. वसंतराव जगताप यांच्या वैचारिक साथीने त्यांनी मराठवाड्यात सामाजिक बदलाची भक्कम पायाभरणी केली. 1985 साली लातूर येथे मराठवाड्यातील पहिले कौटुंबिक समुपदेशन केंद्र सुरू करून त्यांनी महिलांना आधार देणारे व्यासपीठ उपलब्ध करून दिले.
सुमतीताईंनी लातूर व धाराशिव जिल्ह्यातील 100 हून अधिक गावांमध्ये कार्य करत युवक-युवतींना स्वावलंबनाचे प्रशिक्षण, आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन, बालमजुरी व बालविवाहाविरोधात मोहिमा, तसेच जलसंवर्धनाच्या उपक्रमांद्वारे ग्रामीण जीवनमान उंचावले.
त्यांच्या कार्यातील दोन महत्त्वाचे टप्पे विशेष उल्लेखनीय ठरले आहेत. अमरावती जिल्ह्यात ‘सेव्ह द चिल्ड्रन’ अंतर्गत कुपोषणाविरुद्ध उभारलेला लढा आणि परभणी येथे ‘शांती प्रकल्प’च्या माध्यमातून वंचित घटकांच्या मुलांना शिक्षण व सन्मानाची नवी वाट देणे—या उपक्रमांनी हजारो कुटुंबांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवला.
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्तरांतून त्यांना शुभेच्छांचा वर्षाव होत असून, त्यांच्या कार्याने अनेकांना प्रेरणा दिली आहे. संघर्ष, त्याग आणि निःस्वार्थ सेवाभाव यांची सांगड घालणाऱ्या सुमतीताई जगताप या खऱ्या अर्थाने महाराष्ट्रासाठी प्रेरणास्थान ठरत आहेत.








