धीरेंद्र शास्त्रीच्या माफीवरून रोहित पवार आक्रमक; “भोंदू बाबांची पोकळ माफी महाराष्ट्र सहन करणार नाही.

महाराष्ट्र खाकी (पुणे / विवेक जगताप ) – धीरेंद्र शास्त्रीच्या वादग्रस्त वक्तव्यांवरून राज्यात संतापाची लाट उसळली असताना आमदार Rohit Pawar यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत धीरेंद्र शास्त्रीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. रोहित पवार म्हणाले, “जाणीवपूर्वक चुकीची वक्तव्य करायची, खोटा इतिहास सांगायचा, जनतेचा रोष वाढला की माफी मागायची आणि पुन्हा तेच प्रकार करायचे, ही एक विकृत प्रवृत्ती आहे. अशा प्रवृत्तींना आमचा नेहमीच ठाम विरोध राहिला आहे.”

त्यांनी पुढे धीरेंद्र शास्त्रीला थेट “भोंदू” संबोधत म्हटले की, “भोंदू धीरेंद्र शास्त्रीने याआधी संत तुकोबारायांचा अपमान केला होता. आता छत्रपतींचा तसेच महिलांचाही अपमान केला. जनतेत संताप उसळल्यानंतर ‘माझे वक्तव्य चुकीच्या पद्धतीने दाखवले’ असे सांगत तो माफी मागत आहे. पण ही माफी पूर्णपणे पोकळ आहे.” रोहित पवार यांनी स्पष्ट केले की, “धीरेंद्र शास्त्री जे बोलला ते जसाच्या तसे मीडियाने दाखवले आहे. माफी मागताना त्याने आपल्या चुकीच्या वक्तव्यावर कोणतेही ठोस स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यामुळे ही माफी केवळ दिखावा आहे, पश्चात्ताप नाही.”

महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा उल्लेख करत त्यांनी इशाराही दिला. “महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. येथे संतांबद्दल नेहमीच आदर आहे. पण संत असल्याचा आव आणत जर कोणी महापुरुषांचा अपमान करत असेल, तर अशा पाखंडी आणि भोंदू बाबांना संत तुकोबारायांनी सांगितल्याप्रमाणे ‘नाठाळच्या माथी हाणू काठी’ याचा प्रत्यय महाराष्ट्र दाखवू शकतो,” असा थेट इशारा रोहित पवार यांनी दिला. धीरेंद्र शास्त्रीच्या माफीवरून आता राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्हे दिसत असून, महाराष्ट्रातील जनतेच्या भावना तीव्र झाल्या आहेत.

Recent Posts