ॲड. परीक्षित पवार यांच्या माध्यमातून औशाला मिळाली जलक्रांतीची मुहूर्तमेढ, “जलसमृद्ध औसा अभियान”चा फत्तेपूर येथे धडाकेबाज शुभारंभ

महाराष्ट्र खाकी (औसा / विवेक जगताप ) – लातूर जिल्ह्यातील औसा मतदारसंघातील दुष्काळी भागाला समृद्धीचा नवा चेहरा देण्यासाठी एक ऐतिहासिक आणि महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू झाला आहे, क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड. परीक्षित पवार यांच्या नेतृत्वात आणि आमदार अभिमन्यू पवार यांच्या मार्गदर्शनात “जलसमृद्ध औसा अभियान” टप्पा-१ चा उत्साही उद्घाटन सोहळा सोमवार दि. १३ एप्रिल २०२६ रोजी फत्तेपूर येथे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला.

“औसा जलसमृद्ध करण्याच्या दिशेने हे पहिले महत्त्वाचे पाऊल असून, भविष्यात जलसमृद्धीचे स्वप्न आपण नक्की साकार करू ” असा जोरदार विश्वास व्यक्त करताना ॲड. परीक्षित पवार  पुढे म्हणाले, “तरुणांनी मोठ्या संख्येने पुढे यावे. ‘जलसमृद्ध औसा’ उपक्रमातून गावाचा पूर्ण कायापालट करू. लोकांच्या खांद्याला खांदा लावून, सर्व मतभेद बाजूला ठेवून एकत्रित काम केल्यास प्रत्येक गावाचा चेहरामोहरा बदलून टाकू ”

महाराष्ट्र शासन, क्रिएटिव्ह फाउंडेशन, टाटा मोटर्स फाउंडेशन आणि नाम फाउंडेशन यांच्या मजबूत संयुक्त भागीदारीतून राबवल्या जाणाऱ्या या अभियानातून केवळ पाणी अडवणे नव्हे, तर गावांच्या सर्वांगीण विकासाला नवी गती देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. ॲड. परीक्षित पवार यांनी तरुणाईला विशेष आवाहन करताना सांगितले की, “जलसंधारणासोबत शेती, रोजगार आणि गावातील सर्व क्षेत्रांत प्रगती साधण्यासाठी हा उपक्रम गावकेंद्रित शाश्वत विकासाची नवी दिशा ठरेल.”

जलसमृद्ध औसा = समृद्ध औसा
या अभियानामुळे औसा तालुक्यातील गावे दुष्काळमुक्त होण्यासोबतच शाश्वत विकासाच्या मार्गावर निघणार आहेत. तरुणाई, गावकरी आणि सर्व नागरिकांनी या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन औशाला नवी उंची द्या, असे आवाहन क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष अॅड. परीक्षित पवार यांनी केले.

Recent Posts