महाराष्ट्र खाकी (उमरगा / विवेक जगताप ) – उमरगा तालुक्यातील ९ जिल्हा परिषद गट व १८ पंचायत समिती गणाच्या निवडणुका लोकशाही मूल्य जपत शांततेत पार पडल्या. महायुती व महाविकास आघाडी यांच्यात झालेल्या या निवडणूक प्रक्रियेत मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत एकूण सरासरी ६३ टक्के मतदान केले. जिल्हा परिषदेच्या ३१ तर पंचायत समितीच्या ५३ उमेदवारांचे भवितव्य आता ईव्हीएममध्ये सुरक्षित झाले असून याचा निर्णय सोमवारी (दि. ९) जाहीर होणार आहे.
मोठ्या राजकीय घडामोडीनंतर पार पडलेल्या या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह सर्वच राजकीय पक्षांनी सकारात्मक प्रचारावर भर दिला. विविध पक्षांच्या नेत्यांनी गावोगावी भेटी देत विकासाचा अजेंडा मतदारांसमोर मांडला.
भारतीय जनता पक्षातर्फे माजी मंत्री बसवराज पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन बापुराव पाटील, शिवसेना (शिंदे) कडून माजी खासदार प्रा. रविंद्र गायकवाड, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, राष्ट्रवादी काँग्रेस (अप) कडून प्रा. सुरेश बिराजदार, तर काँग्रेसकडून युवक काँग्रेसचे सचिव महेश देशमुख व जिल्हाध्यक्ष आश्लेष मोरे यांनी प्रचारात सक्रिय सहभाग घेतला.
कवठा, तुरोरी, कुन्हाळी, गुंजोटी, दाळिंब, येणेगुर, आलुर, कदेर व बलसुर या नऊ जिल्हा परिषद मतदारसंघात मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. प्रशासन, पोलीस यंत्रणा व निवडणूक कर्मचाऱ्यांच्या नियोजनामुळे कोणताही अनुचित प्रकार न घडता मतदान यशस्वी झाले.
आता रविवारचा दिवस निकालाबाबत अंदाज व चर्चेत जाणार असून सोमवारी मतमोजणीनंतर जनतेच्या कौलाचे चित्र स्पष्ट होणार आहे.



