महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – लातूर महानगरपालिकेत महापौर-उपमहापौरांची निवड झाल्यानंतर शहरातील प्रलंबित प्रश्नांवर गती येईल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. मात्र अंबाजोगाई रोडवरील जटाळ हॉस्पिटलच्या मागील बाजूस उभारण्यात आलेल्या खासगी उड्डाणपुलाबाबतचा प्रश्न आजही अनुत्तरित आहे.
हॉस्पिटल आणि समोरच्या बिल्डिंगला जोडण्यासाठी सार्वजनिक रस्ता ओलांडत उभारलेला हा पूल अधिकृत आहे की अनधिकृत? हा मूलभूत प्रश्न आहे. जर हा पूल मनपाच्या परवानगीने आणि सर्व नियमांची पूर्तता करून उभारण्यात आला असेल, तर संबंधित कागदपत्रे आणि परवानग्या सार्वजनिक कराव्यात. नागरिकांसमोर स्पष्ट खुलासा करावा.
परंतु जर हा पूल अनधिकृत असेल, तर इतकी वर्षे त्यावर कारवाई का झाली नाही? प्रशासकांच्या काळात आयुक्त व उपआयुक्त कारभार पाहत होते. त्या वेळी या बांधकामाकडे दुर्लक्ष का करण्यात आले? अर्थपूर्ण व्यवहार, राजकीय दबाव किंवा कुणाच्या आशीर्वादामुळे हा खासगी उड्डाणपूल उभा राहिला का? असा गंभीर सवाल आता उपस्थित होत आहे.
सार्वजनिक रस्त्यावरून दोन खासगी इमारतींना जोडणारा पूल उभारणे हा केवळ बांधकामाचा मुद्दा नाही, तर तो सुरक्षेचा, नियमांचा आणि समान न्यायाचा प्रश्न आहे. सामान्य नागरिकांचे किरकोळ बांधकाम नियमबाह्य ठरवून तोडले जाते, मग या पूलाबाबत वेगळी मापदंड का?
महापौर, आयुक्त आणि संबंधित बांधकाम विभागाने तात्काळ याबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करावी. पूल अधिकृत असेल तर कागदपत्रे जाहीर करावीत; अनधिकृत असेल तर तत्काळ कारवाई करून संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करावी.
लातूरकरांना आता केवळ आश्वासन नव्हे, तर पारदर्शकता आणि ठोस कृती हवी आहे.



