लातूर आऊटर रिंगरोड प्रकल्पाला गती; NHAI कडून डीपीआरसाठी निविदा जाहीर, आमदार अभिमन्यू पवार यांनी गडकरी आणि फडणवीसांचे मानले आभार

महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – लातूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा लातूर आऊटर रिंगरोड प्रकल्प आता प्रत्यक्ष मार्गावर येत असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. या प्रकल्पाच्या दिशेने मोठे पाऊल टाकत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) यांनी डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) तयार करण्यासाठी तज्ज्ञ एजन्सीची नियुक्ती करण्याकरिता निविदा मागविल्या आहेत.

सुमारे ६० किमी लांबीच्या आणि ४ पदरी असलेल्या लातूर आऊटर रिंगरोडमुळे शहरातील अंतर्गत वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार असून, शहराबाहेरील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. यामुळे औद्योगिक विकास, दळणवळणाची गती आणि अपघातांचे प्रमाण कमी होण्यासही हातभार लागणार आहे.

या महत्त्वपूर्ण घडामोडीची माहिती औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली असून, या प्रकल्पाला गती मिळाल्याबद्दल त्यांनी सर्व संबंधितांचे आभार मानले आहेत.

देशाचे रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार व्यक्त करत, हा प्रकल्प लातूरच्या विकासात मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. लातूरकरांसाठी ही एक दिलासादायक आणि सकारात्मक बातमी मानली जात आहे.