महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – लातूर येथे रेल्वे कोच फॅक्टरी उभारणीसाठी मांजरा साखर कारखान्याने तब्बल १० एकर जमीन दिली होती. हा प्रकल्प लातूरच्या विकासासाठी महत्त्वाचा मानून आम्ही त्याचे स्वागतच केले होते. मात्र या प्रकल्पातून प्रत्यक्षात किती रोजगार निर्माण झाला, हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे, असे म्हणत माजी पालकमंत्री तथा आमदार अमित देशमुख यांनी भाजपावर आणि त्यांच्या तथाकथित विकास धोरणावर जोरदार टीका केली आहे.
आमदार देशमुख म्हणाले की, मोठमोठे प्रकल्प आणल्याचे श्रेय घेण्यात भाजप आघाडीवर आहे, पण त्या प्रकल्पांचा स्थानिक तरुणांना नेमका किती फायदा झाला, याची स्पष्ट माहिती देण्यास सरकार अपयशी ठरत आहे. रेल्वे कोच फॅक्टरीसाठी जमीन उपलब्ध करून दिल्यानंतरही अपेक्षित रोजगार, पूरक उद्योग आणि आर्थिक गती लातूरला मिळाली नाही, हे वास्तव आहे.
फक्त घोषणा आणि फलक लावून विकास होत नाही, तर रोजगारनिर्मिती, स्थानिक सहभाग आणि दीर्घकालीन नियोजन आवश्यक आहे, असेही आ.अमित देशमुख यांनी ठामपणे सांगितले.




