महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप )- उपमुख्यमंत्री अजित पवार तिजोरीत पैसे नसतील तर तुम्ही केलेल्या सत्तर हजार घोटाळ्यातील पैसे सरकार दरबारी जमा करा आणि शेतकऱ्यांची कर्ज माफी करा असा हल्लाबोल शेतकरी नेते विजयकुमार घाडगे यांनी केला आहे. मुसळधार पाऊसामुळे मराठवाड्यात भयानक पूरस्थिती निर्माण झाली आहे. याचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. काढणीला
आलेल्या पिकांचं अतिवृ्ष्टीने नुकसान झाल्यामुळे आता शेतकऱ्यांनी टाहो फोडला आहे. त्यामुळे पूरग्रस्त शेतकऱ्यांसह विरोध पक्षाकडून शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची मागणी केली जात आहे. अशातच बीड दौऱ्यावर असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांना एका व्यक्तीने कर्जमाफी करा, असं म्हणताच, ‘पैशांचं सोंग आणता येत नाही, आम्हाला कळतंय ना, आम्ही गोट्या खेळायला आलोय
का?’ असं संतप्त उत्तर दिलं होतं. त्यांच्या याच वक्तव्यावर शेतकरी नेते विजयकुमार घाडगे यांनी सडकून टीका केली आहे. सरकारी तिजोरीत पैस नसतील तर तुम्ही करोडो रुपये खर्च करून विमान आणि हेलिकॉप्टरने का फिरत आहेत,आमच्याकडे पैसे नाहीत हे सांगण्यासाठी फिरत आहेत का असा प्रश्न घाडगेनीं उपस्तित केला आणि पुढे बोलताना म्हणाले अजित पवार तुम्ही सत्तर कोटींचा खेळ केला आहे हे
सर्व जनतेला माहित आहे. साडे आठ हजार रुपयांची मदत जाहीर करून शेतकऱ्यांच्या दुःखावर मिठ चोळायचं काम केल आहे. शेतकरी जगवायचा असेल तर सरसकट कर्ज माफी जाहीर करा आणि तिजोरीत पैसे नसतील तर तुम्ही केलेल्या सत्तर हजार घोटाळ्यातील पैसे सरकार दरबारी जमा करा आणि शेतकऱ्यांची कर्ज माफी करा असा हल्लाबोल शेतकरी नेते विजयकुमार घाडगेनीं केला आहे.
