महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – लातूर शहरातील नागरिकांनी प्लास्टिक कॅरीबॅग वापर टाळून कापडी बॅगचा वापर करावा व पर्यावरण संवर्धनास हातभार लावावा असे आवाहन उपायुक्त डॉ. पंजाबराव खानसोळे यांनी केले आहे. लातूर शहरात प्लास्टिक विक्री करणाऱ्यांवर, गोडाऊनवर मागील दोन दिवसांपासून महानगरपालिकेच्या आयुक्त मानसी यांच्या आदेशानुसार उपायुक्त डॉ पंजाबराव
खानसोळे यांच्या नेतृत्वात महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने धडक कारवाई करण्यात येत आहे. गुरूवार, दि. 21 ऑगस्ट आणि शुक्रवार, दि. 22 ऑगस्ट या दोन दिवशी राबविलेल्या मोहिमेत तब्बल 1030 किलो सिंगल युज प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. यावेळी संबंधितांकडून दीड लाखांचे साहित्य जप्त करत 75 हजारांचा दंडही वसूल केला आहे. सदरील कारवाई मध्ये सर्व क्षेत्रिय कार्यालय ए, बी,
सी, डी च्या मुख्य स्वच्छता निरीक्षक रवि कांबळे, धोंडिबा सोनवणे, शिवराज शिंदे, अक्रम शेख यांच्या पथकाने धडक कारवाई करून प्लास्टिक जप्त करून दंडात्मक कारवाई करण्यात आली. कारवाई मध्ये स्वच्छता निरीक्षक प्रदीप गायकवाड, आशिष साठे, रवी शेंडगे, सुनील कांबळे, व ईतर क्षेत्रिय कार्यालयाअंतर्गत त्यात्या भागातील स्वच्छता निरीक्षक, अतिक्रमण विभागाचे कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. दरम्यान,
सलग दोन दिवसात झालेल्या धडक कारवाईमुळे नियमांना डावलणाऱ्यांचे मात्र धाबे दणाणले आहे. ही मोहीम अशीच सुरू राहणार असून आगामी सणासुदीच्या दिवसांमध्ये नागरिकांनी प्लास्टिक कॅरीबग वापर टाळून कापडी बॅगचा वापर करावा व पर्यावरण संवर्धनास हातभार लावावा असे आवाहन उपायुक्त डॉ. पंजाबराव खानसोळे यांनी केले आहे.
