महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – लातूर वाहतूक शाखेच्या API बी. व्ही. गिते यांच्या कर्तव्यदक्षतेचे कौतुक; रात्रीच्या वेळी रस्त्यावरील बॅरिगेट पडलेले हटवून टाळला मोठा अपघात “सरकारी नोकरी करणारे अनेक असतात, पण स्वतःच्या कर्तव्याशी प्रामाणिक राहून जनसेवेचे व्रत जपणाऱ्यांची संख्या विरळच असते.” पोलीस खात्यातील नोकरी म्हणजे २४ तास आव्हाने आणि अग्निदिव्य! मात्र, याच अग्निदिव्यातून जात असतानाही आपल्या तत्परतेने आणि कर्तव्यदक्षतेने नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देणारे अधिकारी लातूरकरांना पाहायला मिळत आहेत. लातूर शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) बी. व्ही. गिते यांच्या अशाच एका कौतुकास्पद कार्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.
दिवसभराची धावपळ आणि आपली सेवा बजावून रात्री १०:३० च्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. व्ही. गिते हे घरी परतत होते. त्यावेळी गवळी चौकात पोहोचले असता, रस्त्यावर दुभाजकाजवळ बसवण्यात आलेले एक बॅरिगेट आडवे पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. रात्रीच्या अंधारात यामुळे एखादा गंभीर अपघात घडून कोणाचा तरी जीव धोक्यात येऊ शकला असता. ही गोष्ट लक्षात येताच, कोणताही विलंब न करता आणि स्वतःचा हुद्दा किंवा थकवा बाजूला ठेवून, API बी. व्ही. गिते यांनी स्वतः गाडीतून उतरून ते जड बॅरिगेट उचलून व्यवस्थित जागेवर लावले.
माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी व्यक्त केली कौतुक करणारी पोस्ट
या घटनेचा व्हिडिओ लातूरचे माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत API बी. व्ही. गिते यांच्या या कृतीचे जोरदार कौतुक केले आहे. ”व्हिडिओमध्ये दिसत असलेले लातूर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) बी. व्ही. गितेजी आहेत. दिवसभर अविरत सेवा बजावून रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास घरी जात असताना, गवळी चौकातील आडवे पडलेले बॅरिगेट पाहून त्यांनी स्वतः पुढाकार घेतला आणि होणारा अपघात टाळला. त्यांच्या या सतर्कतेमुळे आणि कर्तव्याच्या जाणिवेमुळे मोठा अपघात टळला आहे. अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचा लातूरकरांना सार्थ अभिमान आहे.”
शहर वाहतुकीला मिळाली नवी शिस्त, लातूर पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वाहतून शाखेचे मनोज जिरगे आणि बी. व्ही. गिते यांच्या नेतृत्वात लातूर शहरातील वाहतूक व्यवस्थेत कमालीचा सकारात्मक बदल दिसून येत आहे. वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाययोजना करणे, अपघातांचे प्रमाण कमी करणे आणि शिस्त प्रस्थापित करणे यात त्यांचा मोठा वाटा आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून, एका पोलीस अधिकाऱ्याची ही तत्परता आणि साधेपणा पाहून संपूर्ण लातूरकरांकडून API बी. व्ही. गिते यांच्यावर अभिनंदनाचा व कौतुकाचा वर्षाव होत आहे.




