महाराष्ट्र खाकी (परळी वैजनाथ / प्रतिनिधी) – माती, निसर्ग आणि पारंपरिक आहार संस्कृतीशी असलेले नाते अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने परळी येथे रानभाजी महोत्सवाचे दिमाखात उद्घाटन करण्यात आले. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालय, परळी वैजनाथ यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन झाले, तर उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
‘आरोग्यदायी रानभाज्यांची ओळख’ पुस्तकाचे प्रकाशन
महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरले ते परळीच्या तालुका कृषी अधिकारी अर्चनाताई नागरगोजे यांच्या ‘आरोग्यदायी रानभाज्यांची ओळख’ या पुस्तकाचे प्रकाशन. या पुस्तकात तब्बल ७३ रानभाज्यांची सविस्तर माहिती, त्यांचे आरोग्यदायी महत्त्व, ओळख आणि त्यामागील पारंपरिक ज्ञान मांडण्यात आले आहे. पावसाळ्यात नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या या रानभाज्या पूर्वीच्या पिढ्यांच्या आहाराचा मुख्य भाग होत्या. मात्र, बदलत्या जीवनशैलीत हे पारंपरिक ज्ञान लोप पावत चालल्यामुळे ते नवीन पिढीपर्यंत पोहोचवणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात केले.
स्थानिक संपत्तीला बाजारपेठेची जोड देण्याची गरज
रानभाज्यांकडे केवळ पारंपरिक अन्न म्हणून न बघता त्यातील आर्थिक क्षमता ओळखण्याची वेळ आली आहे. शास्त्रीय पद्धतीने संकलन, लागवड, मूल्यवर्धन, प्रक्रिया, पॅकेजिंग आणि थेट बाजारपेठेशी जोडणी केल्यास शेतकरी, महिला बचतगट आणि ग्रामीण युवकांसाठी उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होऊ शकतात. ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी स्थानिक नैसर्गिक संपत्तीचे ब्रँडिंग व प्रक्रिया उद्योग उभारण्याची आवश्यकता उपस्थितांनी व्यक्त केली.
शाश्वत विकासासाठी उपक्रमांना व्यापक स्वरूप हवे
आधुनिक विज्ञानाची जोड देत स्थानिक जैवविविधता आणि आहारसंस्कृतीचे संवर्धन करणे काळाची गरज आहे. रानभाजी महोत्सवासारख्या उपक्रमांमुळे आरोग्य, पर्यावरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळते. त्यामुळे ‘परंपरेपासून रोजगाराकडे आणि स्थानिक ज्ञानापासून शाश्वत विकासाकडे’ वाटचाल करण्यासाठी अशा उपक्रमांना आणखी व्यापक स्वरूप देण्याचा सूर या महोत्सवातून उमटला.




