Home » पोलीस » LCB चे API पांडुरंग माने आणि PSI राजाभाऊ घाडगे यांच्या सतर्कतेमुळे खुनातील आरोपी २४ तासांत अटक, लातूर LCB ची मोठी कारवाई

LCB चे API पांडुरंग माने आणि PSI राजाभाऊ घाडगे यांच्या सतर्कतेमुळे खुनातील आरोपी २४ तासांत अटक, लातूर LCB ची मोठी कारवाई

महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – लातूर शहरातील विवेकानंद चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या सनसनाटी खुनाच्या गुन्ह्यातील दोन पाहिजे असलेल्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने अत्यंत धडाडीने आणि कौशल्याने २४ तासांच्या आत जेरबंद केले आहे. २९ ऑगस्ट २०२६ रोजी वासनगाव पाटी येथे सापळा रचून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे लातूर पोलिसांच्या सतर्कतेची आणि कार्यक्षमतेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

काय आहे नेमकी घटना?
२६ ऑगस्ट रोजी सकाळी ११:४५ वाजण्याच्या सुमारास बाभळगाव नाक्याकडे जाणाऱ्या रिंग रोडवरील यशोदिप हायड्रोलिक दुकानासमोर मयत किरण कालिदास सगर याच्यावर पूर्वद्वेषातून किंवा अन्य कारणावरून पाच जणांच्या टोळक्याने लाठी-काठ्यांनी बेदम मारहाण केली होती. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या किरण सगर उपचारादरम्यान मृत पावल्याने विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात खुनाचा (कलम १०३(१) सह विविध कलमांन्वये) गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गंभीर गुन्ह्यामुळे शहरात खळबळ उडाली होती.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी आरोपींना तात्काळ अटक करण्याचे सक्त आदेश दिले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने आणि पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ  घाडगे यांनी आपल्या तपास पथकासह तातडीने सूत्रे हलवली.
तांत्रिक विश्लेषण आणि खबऱ्यांच्या माहितीच्या आधारे, सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने आणि PSI राजाभाऊ घाडगे यांनी २९ ऑगस्ट रोजी वासनगाव पाटी परिसरात अत्यंत चलाखीने सापळा रचला. या सापळ्यात गुन्ह्यातील प्रमुख आरोपी १) बालाजी मोतीराम मस्के (वय ४४ वर्षे, रा. बाभळगाव, लातूर) २) बालाजी हनुमंत फिस्के (वय ३४ वर्षे, रा. महाराणा प्रताप नगर, लातूर) या दोघांना जेरबंद करण्यात पोलिसांना मोठे यश आले. ताब्यात घेतलेल्या दोन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी विवेकानंद चौक पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

खुनासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी तातडीने जेरबंद करून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे उत्कृष्ट काम स्थानिक गुन्हे शाखेने केले आहे. विशेषतः सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने  व पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे यांनी दाखवलेली कर्तव्यदक्षता, सतर्कता आणि तपासातील वेग यामुळे लातूर पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्वसामान्य नागरिकांमधून कौतुक होत आहे.

या धडाकेबाज कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने व PSI राजाभाऊ घाडगे यांच्यासह पोलीस अंमलदार युवराज गिरी, राजेश कंचे, हरी पतंगे, मोहन सुरवसे, रामदास बाचीफळे, सिद्धेश्वर मदने, जमीर शेख, राहुल कांबळे, काकासाहेब बोचरे व संतोष खांडेकर या पथकातील अन्य कर्मचाऱ्यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गुन्ह्यातील फरार असलेल्या इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत

Share This News

Related Post

National