महाराष्ट्र खाकी ( पिंपरी -चिंचवड / विवेक जगताप ) – गेल्या दहा वर्षांपासून रखडलेला पिंपळे सौदागरमधील त्रिओस (Triose) आणि झुलेलाल परिसर जोडणारा महत्त्वाचा रस्ता अखेर नागरिकांच्या संतापाचे केंद्र बनला आहे. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे संयम सुटलेल्या त्रस्त नागरिकांनी आता रस्त्यावर उतरत #त्रिसेझूलेलालरोडजास्तीचे ही तीव्र मोहीम पुकारली आहे. आज शेकडो नागरिक एकत्र येत महापालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि प्रशासनाचा तीव्र निषेध नोंदवला.
प्रशासनाची पोकळ आश्वासने; नागरिकांचा स्पष्ट इशारा
आंदोलनाची तीव्रता वाढताच स्थानिक प्रतिनिधी कुंदाताई भिसे आणि बापू काटे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पिंपळे सौदागर महानगरपालिका (PCMC) अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेदरम्यान अधिकाऱ्यांनी नेहमीप्रमाणे “रस्त्याचे काम प्रक्रियेत आहे,” असा जुनाच सूर आवळला.
मात्र, संतापलेल्या नागरिकांनी अधिकाऱ्यांची ही जुनी टोलवाटोलवी धुडकावून लावली. “गेली दहा वर्षे केवळ आश्वासनांचे गाजर दाखवले जात आहे, आता आम्हाला कागदी आश्वासने नकोत तर प्रत्यक्ष काम आणि निश्चित कालमर्यादा हवी!” अशी ठाम भूमिका नागरिकांनी घेतली.
आंदोलन अधिक तीव्र करण्याचा नागरिकांचा इशारा
स्थानिक प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत नागरिकांनी थेट इशारा दिला आहे, रस्त्याचे काम तातडीने सुरू न झाल्यास हा लढा आणखी तीव्र केला जाईल. महापालिका (PCMC) कार्यालयापासून थेट आमदार आणि खासदारांच्या कार्यालयापर्यंत तीव्र आंदोलने छेडली जातील. दहा वर्षांपासून रखडलेला हा विकासप्रश्न नेमका कधी मार्गी लागणार आणि या नागरिकांची प्रतीक्षा खऱ्या अर्थाने कधी संपणार, याकडे आता संपूर्ण पिंपळे सौदागरचे लक्ष लागले आहे.




