महाराष्ट्र खाकी ( विवेक जगताप/ लातूर) – लातूर शहर महानगरपालिकेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढवण्याचा घेतलेला निर्णय आता राजकीयदृष्ट्या फायदेशीर ठरत असल्याचे चित्र आहे. पक्षाने 57 जागांवर उमेदवार देत सर्व समाजांना प्रतिनिधित्व देण्याची रणनीती आखली असून, हे ‘सोशल इंजिनिअरिंग’ निवडणुकीत राष्ट्रवादीसाठी निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
अल्पसंख्यांक, ओबीसी, मागासवर्गीय, लिंगायत, मराठा, एसटी तसेच व्यापारी व कारागीर समाजाचा समतोल साधत उमेदवारांची निवड केल्यामुळे राष्ट्रवादीने थेट विविध समाजघटकांशी संवाद साधला आहे. यामुळे पक्षाला परंपरागत मतदारांसह नव्या मतदारवर्गाचा विश्वास मिळत असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
पक्षाच्या यादीत अल्पसंख्यांक समाजातील 14, ओबीसी 12, मागासवर्गीय 14, मराठा 7, लिंगायत 6, एसटी 1 तसेच मारवाडी (माहेश्वरी, ब्राह्मण, सोनार), कुरेशी व नाभिक समाजातील उमेदवारांचा समावेश आहे. ही सामाजिक रचना पाहता राष्ट्रवादी काँग्रेसने “सर्वसमावेशकता” हाच प्रचाराचा केंद्रबिंदू केल्याचे स्पष्ट होते.
अनुभव आणि नव्या चेहऱ्यांचा योग्य मेळ साधत 1 माजी महापौर, 1 माजी उपमहापौर, 1 माजी नगराध्यक्ष व 9 माजी नगरसेवकांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनाचा अनुभव असलेले चेहरे आणि स्थानिक पातळीवर ओळख असलेले उमेदवार हे राष्ट्रवादीसाठी मोठे भांडवल ठरत आहेत.
प्रभाग क्रमांक 15 मध्ये दिवंगत ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनानंतर उमेदवार न देण्याचा निर्णय घेत, पक्षाने संवेदनशील आणि सहानुभूतीपूर्ण भूमिका घेतली आहे. या निर्णयामुळेही राष्ट्रवादीला नैतिक व राजकीय लाभ मिळण्याची चर्चा आहे.
एकूणच, लातूर मनपा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने आखलेले सोशल इंजिनिअरिंग केवळ सामाजिक समतोलापुरते मर्यादित न राहता थेट राजकीय फायद्यात रूपांतरित होत असल्याचे दिसत आहे. विविध समाजांचा विश्वास, अनुभवी नेतृत्व आणि भावनिक मुद्द्यांवर घेतलेले निर्णय यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका या निवडणुकीत भक्कम मानली जात आहे.


