महाराष्ट्र खाकी ( विवेक जगताप / लातूर ) – लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील अत्यंत दुर्गम व डोंगराळ भागातील जानवळ प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य व्यवस्थेचा गंभीर व धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. केंद्रात नियुक्त दोन वैद्यकीय अधिकारी बुधवारी (दि. ३१) गैरहजर असताना, सर्व नियम व कायदे धाब्यावर बसवून महाळंगी उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी (CHO) डॉ. करण राठोड यांनी थेट प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांची तपासणी केल्याचे समोर आले आहे.
विशेष म्हणजे, महाळंगी उपकेंद्र बंद ठेवून सीएचओंनी प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्ण तपासणी केल्याने संपूर्ण व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. रुग्ण तपासणी व उपचार करण्याचे अधिकार केवळ पात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनाच असताना, सीएचओकडून करण्यात आलेली ही कृती म्हणजे गोरगरीब रुग्णांच्या जीवाशी थेट खेळ असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
जानवळ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत जानवळ, महाळंगी, जढाळा, शिवणखेड, झरी (बु.) या पाच उपकेंद्रांसह अनेक तांडे-वाड्यांचा समावेश होतो. सुमारे ७५ हजार लोकसंख्येच्या आरोग्याची जबाबदारी असलेले हे केंद्र महत्त्वाचे असताना, येथे डॉक्टरच गायब असणे ही गंभीर बाब आहे. आठवड्यातील तीन-तीन दिवस दोन्ही वैद्यकीय अधिकारी हजर राहत असल्याचे सांगितले जाते; मात्र त्या दिवशी नेमके काय झाले, डॉक्टर कुठे गायब होते, याचे स्पष्टीकरण अद्याप मिळालेले नाही.
रुग्णांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोग्य केंद्रात डॉक्टर नसून “दुसरेच कुणीतरी” तपासणी करत असल्याचे लक्षात आल्यानंतर परिसरात संतापाची लाट उसळली. आधीच दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य सुविधांसाठी मोठा संघर्ष करावा लागतो, त्यात अशा बेजबाबदार कारभारामुळे त्यांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याचा संतप्त सूर नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
लातूर जिल्हा आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवर यामुळे गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीची चौकशी, सीएचओंनी अधिकाराबाहेर जाऊन केलेल्या रुग्ण तपासणीवर तात्काळ कारवाई आणि भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
“डॉक्टर नसतील तर केंद्र बंद ठेवा, पण नियमबाह्य उपचार करून आमच्या जीवाशी खेळ करू नका,” अशी तीव्र प्रतिक्रिया रुग्णांकडून व्यक्त होत आहे.


