महाराष्ट्र खाकी (पिंपरी – चिंचवड/ विवेक जगताप ) – पिंपरी-चिंचवड शहराचा विकास अधिक वेगाने, नियोजनबद्ध आणि नागरिककेंद्रित पद्धतीने व्हावा, तसेच नागरिकांना दर्जेदार मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत आमदार शंकर जगताप यांची उच्चस्तरीय आढावा बैठक पार पडली. या बैठकीत शहरातील प्रमुख विकासकामांवर सखोल चर्चा झाली आणि प्रत्यक्ष कामांना गती देण्यासाठी स्पष्ट निर्देश देण्यात आले.
बैठकीत घेतलेले महत्त्वाचे मुद्दे
1) वाहतूक सुधारणा व उड्डाणपूल प्रकल्प
पिंपळे सौदागर येथील स्वराज चौक अंडरपास आणि पी.के. चौक उड्डाणपूलासाठी निधीची तरतूद करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. तसेच पिंपळे गुरव येथील कल्पतरू चौकात अंडरपास उभारण्यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले. यामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
2) पादचारी सुरक्षा व नागरिक सुविधा
सांगवी फाटा येथे पादचारी पूल (फूटओव्हर ब्रिज) उभारण्याबाबत आणि वाल्हेकरवाडी स्मशानभूमी तातडीने सुरू करण्याबाबत ठोस चर्चा झाली. पिंपळे सौदागर येथे पोस्ट ऑफिससाठी हेशीर जागा उपलब्ध करून देण्याचेही आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
3) नाले पुनर्जीवन व पर्यावरण
राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ ला जोडणाऱ्या वाकड, पुनावळे, रावेत, किवळे आणि मामुर्डी परिसरातील बंद नाले पुनर्जीवित करण्याच्या कामाचा सखोल आढावा घेण्यात आला. यामुळे पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या कमी होणार असून पर्यावरण सुधारणार आहे.
4) सार्वजनिक सुविधा व आरक्षण
मामुर्डी येथे पवना नदीकाठी स्मशानभूमीसाठी जागा व निधीची तरतूद करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. तसेच वाकड-पुनावळे परिसराच्या प्रारूप विकास आराखड्यात सुमारे १ हेक्टर जागा एस.टी. बसस्थानकासाठी राखीव ठेवण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
आमदार शंकर जगताप यांनी यावेळी सांगितले, “पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक व्यवस्था, नागरी सुविधा आणि पायाभूत सुविधांमध्ये गुणात्मक सुधारणा होणे ही आजची सर्वात मोठी गरज आहे. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रत्येक विकासकामाचा सातत्याने पाठपुरावा करून ती निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहोत.” या बैठकीमुळे पिंपरी-चिंचवड शहरातील विकासकामांना नवा वेग मिळणार असून नागरिकांना अधिक चांगल्या आणि सुरक्षित सुविधांचा लाभ लवकरच मिळणार आहे.




