Home » महाराष्ट्र » Rajeswar buke राजेश्वर बुके, ऊस शेतकऱ्यांचा पैसा कुठे गेला ? दुष्काळात पिके जळाली, आता बिलासाठी घरात घुसायची वेळ आली! कारखान्याने ऊस घेतला पण बिल दिले नाही;

Rajeswar buke राजेश्वर बुके, ऊस शेतकऱ्यांचा पैसा कुठे गेला ? दुष्काळात पिके जळाली, आता बिलासाठी घरात घुसायची वेळ आली! कारखान्याने ऊस घेतला पण बिल दिले नाही;

महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी मागील हंगामात आपला ऊस राजेश्वर बुके यांच्या श्री साईबाबा शुगर लिमिटेड (शिवनी-गोंद्री) कारखान्याला दिला. पण कारखान्याने अद्याप  बिल दिले नाही. वर्ष उलटले, तरी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. आता दुष्काळाने शेतकऱ्यांची कमर मोडली आहे. पाऊस गायब झाल्याने सोयाबीन, उडीद, मूग, कापूस ही नगदी पिके हातची गेली. शेतीचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले. कर्जबाजारी शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. अशा भयंकर परिस्थितीतही राजेश्वर बुके यांचे कारखाना प्रशासन गप्प बसले आहे.

शेतकरी आता भाड्याने गाड्या करून जिल्ह्याच्या ठिकाणी पोहोचले आहेत. शिवली, शिरूर अनंतपाळ, केळगाव, सलगरा, वांजरखेडा आणि परिसरातील शेकडो शेतकरी – महिला, वृद्ध आणि लहान मुलांसह – राजेश्वर बुके यांच्या दारात बसले आहेत. गयावया, विनवणी आणि ठिय्या सुरू आहे. “आमच्या घामाचा पैसा कुठे गेला? दुष्काळात आमची पिके जळाली, आता ऊसाचे बिलही नाही. आणखी किती दिवस दार ठोठवायचे?” हाच एकच आक्रोश दारावर उमटत आहे. शेतकरी स्पष्ट सांगतात – बिलाची व्यवस्था होईपर्यंत आम्ही इथून उठणार नाही!

ऊस तुटल्यानंतर १४ दिवसांत बिल द्या. इथे मात्र वर्षभर टाळाटाळ. राजेश्वर बुके यांनी शेतकऱ्यांकडून ऊस घेतला, गाळप केले, पण पैसे दिले नाहीत. आता दुष्काळाच्या तीव्र झळा सोसत शेतकरी त्यांच्या दारात यायला भाग पडले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी आणि सहकार मंत्री आणि प्रशासन आता डोळे उघडतील का? की फक्त शेतकऱ्यांनाच दुष्काळ आणि थकीत बिलात होरपळायला सोडले जाईल? राजेश्वर बुके आणि श्री साईबाबा शुगर प्रशासन… आता उत्तर द्या. शेतकरी ठाम आहेत आमचा पैसा द्या, नाहीतर तीव्र आंदोलन करू .

Share This News

Related Post

National