पोलीस

Nanded news निजामाच्या जोखडातून मुक्तीसाठी उमरी बँक, पोलीस स्टेशन हल्ल्याच्या घटनेला 75 वर्षे पूर्ण

महाराष्ट्र खाकी ( नांदेड / विवेक जगताप ) – भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही निजामशाहीमुळे पारतंत्र्यात असलेल्या मराठवाड्याला मुक्तीसाठी जे आंदोलन करावे लागले त्यात नांदेड जिल्ह्यातील उमरी येथील ऐतिहासिक संदर्भही अधिक महत्त्वाचे आहेत. उमरी येथील हैद्राबाद स्टेट बँक,पोलीस स्टेशनवरील हल्ला, रेल्वे रूळ उखडून टाकणे या घटनेला 30 जानेवारी रोजी बरोबर 75 वर्षे पूर्ण झाले.

बँकेवर हल्ला झाला ती बँक खाजगी जागेत असल्याने आज त्या जागेचे स्वरूप बदलले आहे. मात्र निजामाच्या पोलीसाची ज्या पोलीस चौकीवर हल्ला झाला ती इमारत आज त्या काळातील हैद्राबाद मुक्तीच्या आठवणी आपल्या प्रत्येक शिळेवर घेऊन उभी आहे. या उमरी पोलीस स्टेशनच्या भिंती त्या काळातील तिजोरीसह मुक्तीच्या या लढ्याला पुढच्या पिढीसाठी वाहते करण्यास सज्ज आहेत.

पोलीस विभागाने हे पोलीस स्टेशन आहे त्या स्थितीत आजवर व्यवस्थीत जपले असून ऐतिहासिक साक्षीसह उमरीतील शांतता व सुव्यवस्थेसाठी येथून कामकाज पाहिले जाते. दि. 30 जानेवारी 1948 ला निजामाच्या जोखडातून मुक्तीसाठी हा हल्ला व बँकेची लूट करण्यात आली. हल्ल्यापूर्वी एक दिवस अगोदार म्हणजेच 29 जानेवारी रोजी उमरखेडचे स्वातंत्र्य सैनिक देवसरी या

गावी जमले. चार गटात विभागालेल्या या स्वातंत्र्य सैनिकांनी 30 जानेवारी रोजी हल्ला करून निजामाला धास्तावून सोडले. रेल्वेचे रूळ व तारा तोडण्यासाठी बारडचे राजाराम देशमुख, थेरबनचे अमृतराव व 35 सैनिक रवाना झाले. नागनाथ परांजपे यांच्या नेतृत्वाखाली 15 जणांच्या तुकडीने पोलीस स्टेशनवर हल्ल्यासाठी धाव घेतली. यात लहानचे भिमराव देशमुख व इतर मंडळी

होती. रेल्वे स्टेशनवर हल्ल्यासाठी उमरीचे मोहन शर्मा, जगदीश, बाबुराव कुटूंरकर व इतर मंडळी होती. उमरीच्या मोंढ्यातील हैद्राबाद स्टेट बँकेच्या शाखेवर 21 जणांच्या तुकडीने हल्ला केला. यात अनंत भालेराव, आबासाहेब लहानकर, साहेबराव देशमुख-बारडकर, बन्सीलाल तोष्णीवाल, किशोर शहाणे, दिंगबरराव उत्तरवार, शंकरलाल शर्मा, बन्सीलाल मालाणी, धनराज पुरोहित,

रघुनाथ पंडीत, काशिनाथ शेट्टी हे स्थानिक उमरीचे कार्यकर्ते होते. सायंकाळी 4.30 वा. तीनही ठिकाणी हे मुक्तीसाठी हल्ले करण्यात आले. काळ झपाट्याने पुढे जरी गेला असला तरी इतिहासातील अखंड भारताच्या व स्वातंत्र्याच्या लढ्यातील हे ऐतिहासिक संदर्भ नव्या पिढीपर्यंत पोहचणे तेवढेच महत्वाचे आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासमवेत मराठवाडा मुक्तीचा

हा अमृत महोत्सव आता सुरू असून शासनाने यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. “मराठवाडा मुक्तीची ही गाथा नव्या पिढीपर्यंत पोहचावी यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे आम्ही विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्यादृष्टिने लवकरच उमरी आणि बारड येथे ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञांना नव्या पिढीसमवेत आम्ही संवाद घडवून आणत आहोत.” – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत. “उमरी

पोलीस स्टेशन आज ज्या वास्तुत आहे त्या वास्तुचा ऐतिहासिक संदर्भ लाखमोलाचा आहे. पोलीस प्रशासनाच्यावतीने आम्ही ही जागा आहे त्या स्थितीत आजवर त्याच इमारतीतून शांतता व सुव्यवस्थेसाठी सांभाळून ठेवली आहे. या इतिहासाला प्रवाहित करण्यासाठी प्रयत्नरत राहू” – जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे

Most Popular

To Top