महाराष्ट्र खाकी ( पिंपरी/ विवेक जगताप ) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत परवा घडलेल्या एका संशयास्पद प्रकाराने संपूर्ण शहरात आणि प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या केबिनमध्ये जाताना अत्यंत ‘गलेलठ्ठ’ (वजनदार व फुगलेली) असणारी एक बॅग बाहेर येताना चक्क ‘पातळ’ कशी झाली? आणि त्यानंतर शिपायाने पुन्हा तशीच दुसरी गलेलठ्ठ बॅग आत का नेली? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.राज्यभरात महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी आणि मालेगावच्या आयुक्तांना लाचखोरी प्रकरणात थेट पकडण्यात आल्याच्या ताज्या घटना ताज्या असतानाच, पिंपरी-चिंचवड मनपात घडलेला हा प्रकार अत्यंत गंभीर व संशयास्पद मानला जात आहे.
काय आहे नेमका प्रकार ?
मिळालेल्या माहितीनुसार, परवा महापालिका मुख्यालयात काही कार्यकर्त्यांनी एक व्यक्ती गलेलठ्ठ बॅग घेऊन थेट आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या केबिनमध्ये जाताना पाहिली. काही वेळाने तीच बॅग जेव्हा बाहेर आली, तेव्हा ती पूर्णपणे पातळ आणि रिकामी झाल्यासारखी दिसत होती. एवढ्यावरच हे प्रकरण थांबले नाही, तर काही वेळातच शिपाई पुन्हा तशीच दुसरी फुगलेली, जड बॅग घेऊन आयुक्तांच्या केबिनमध्ये जाताना दिसला. या विचित्र प्रकारामुळे उपस्थित कार्यकर्त्यांचा संशय बळावला. त्यांनी तातडीने ती बॅग जागेवरच उघडून दाखवण्याची जोरदार मागणी केली. मात्र, तेथे तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांनी ती बॅग तपासण्याचे धाडस दाखवले नाही. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, स्वच्छ आणि पारदर्शक कारभाराचा दावा करणारे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनीही ती बॅग तिथे उघडण्यास स्पष्ट नकार दिला. उलट, “घरी जाऊन उघडून बघतो,” असे उत्तर देऊन त्यांनी विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. जर त्या बॅगेत काही आक्षेपार्ह किंवा बेकायदेशीर नव्हते, तर ती बॅग जागेवरच कार्यकर्त्यांसमोर उघडून दाखवायला आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना काय हरकत होती? “घरी जाऊन बघतो” हे उत्तर प्रशासकीय प्रमुखाला शोभणारे आहे का?
तपासणी यंत्रे महिनाभराहून बंद; नक्की कोणाला पाठीशी घातले जातेय?
महापालिकेत कोणत्याही भेटवस्तूंवर आणि संशयास्पद वस्तू आणण्यावर अधिकृत बंदी आहे. असे असताना मुख्य प्रवेशद्वारावरील तपासणी यंत्र (स्कॅनर व मेटल डिटेक्टर्स) गेल्या अनेक महिन्यांपासून जाणीवपूर्वक बंद ठेवण्यात आले आहेत का, असा सवाल आता नागरिक विचारत आहेत. तपासणी यंत्रे बंद असल्यामुळेच अशा संशयास्पद जड बॅगा थेट आयुक्तांच्या दालनापर्यंत विनासायास पोहोचत आहेत का?
‘अँटी करप्शन सर्वे समिती’च्या प्रमुख मागण्या
१. स्वतंत्र चौकशी जाहीर करा: आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या केबिनबाहेरील आणि मनपा इमारतीमधील त्या दिवशीचे संपूर्ण CCTV फुटेज तातडीने ताब्यात घेऊन सार्वजनिक केले जावे. 2) प्रवेश नोंदींची तपासणी: ती बॅग घेऊन येणारी व्यक्ती कोण होती? व्हिजिटर रजिस्टरमधील प्रवेश नोंदींची कसून चौकशी झालीच पाहिजे. ३. दोषींवर कारवाई: तपासणी यंत्रे बंद ठेवणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबित करून कारवाई करण्यात आली पाहिजे. राज्य शासनाने आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) या संपूर्ण ‘बॅग मिस्ट्री’ची अत्यंत गांभीर्याने दखल घेऊन निष्पक्ष चौकशी करावी, अन्यथा ‘अँटी करप्शन सर्वे समिती’ या भ्रष्ट कारभाराविरोधात अधिक आक्रमक भूमिका घेईल.




