Home » पोलीस » Latur police अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत सायबर सुरक्षा, सुरक्षा व कायद्याचे सकारात्मक मार्गदर्शन केले

Latur police अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत सायबर सुरक्षा, सुरक्षा व कायद्याचे सकारात्मक मार्गदर्शन केले

महाराष्ट्र खाकी (औसा / विवेक जगताप ) – लातूर पोलीस विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘पोलीस विद्यार्थी संवाद’ उपक्रमांतर्गत अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालय, पोमादेवी जवळगा येथे भेट देऊन विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना नवीन फौजदारी कायदे, अमली पदार्थांचे दुष्परिणाम, सायबर गुन्हे आणि सुरक्षिततेच्या विविध पैलूंबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. या भेटीदरम्यान अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हटले, “विद्यार्थ्यांमध्ये कायद्याविषयी जागरूकता निर्माण करणे आणि त्यांना विविध गुन्ह्यांपासून सुरक्षित ठेवणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. पोलीस विद्यार्थी संवाद उपक्रमाद्वारे आम्ही विद्यार्थ्यांना थेट मार्गदर्शन करत आहोत. कायद्याचे पालन करा, अमली पदार्थांपासून दूर राहा, सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करा आणि कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी न घाबरता पालक, शिक्षक किंवा पोलिसांशी संपर्क साधा. तुमची सुरक्षितता ही आमची जबाबदारी आहे.”

लातूर जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेसमधील विद्यार्थ्यांना पोलीस कार्यपद्धतीची माहिती व्हावी, कायद्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी आणि विविध गुन्ह्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन मिळावे, या उदात्त उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. दिनांक १ ऑगस्ट २०२६ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत सुरू असलेल्या या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील २३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील अधिकारी आणि अंमलदार शाळा-महाविद्यालयांना भेटी देत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ४१९ शाळांना भेटी देऊन एकूण १ लाख ५१ हजार २४७ विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला आहे. या भेटींदरम्यान पोलीस अधिकारी विद्यार्थ्यांना नवीन फौजदारी कायद्यांमधील महत्त्वाच्या तरतुदी, अमली पदार्थांचे सेवन आणि त्याचे दुष्परिणाम, सायबर फ्रॉडपासून बचाव करण्याच्या उपाययोजना, पॉक्सो कायद्याच्या तरतुदी, शस्त्र अधिनियम तसेच महिला व बालकांच्या सुरक्षिततेशी संबंधित विषयांवर सोप्या भाषेत मार्गदर्शन करीत आहेत.

सायबर गुन्ह्यांपासून बचाव करण्यासाठी अनोळखी व्यक्तींना ओटीपी, बँक खात्याची माहिती किंवा इतर गोपनीय माहिती देऊ नये, संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये आणि ऑनलाइन फसवणूक झाल्यास तातडीने संबंधित यंत्रणेशी संपर्क साधावा, असे स्पष्ट आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थी आणि पोलीस यांच्यातील संवाद अधिक दृढ होत असून, विद्यार्थ्यांमध्ये कायदेविषयक जागरूकता, सामाजिक जबाबदारी आणि सुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. लातूर पोलीस विभागाच्या वतीने ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत हा उपक्रम सुरू राहणार असून, भविष्यातही विद्यार्थ्यांच्या सुरक्षित आणि जागरूक विकासासाठी असे सकारात्मक उपक्रम सुरू राहतील, अशी अपेक्षा आहे.

Share This News

Related Post

National